T20 विश्वचषक 2026 : 7 फेब्रुवारी पासून आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 ला (T20 World Cup 2026) सुरुवात होणार आहे. मात्र या स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची परवानगी दिली, पण 15 फेब्रुवारी रोजी नियोजित असलेल्या भारत विरुद्ध ग्रुप स्टेज सामना खेळण्यास मात्र नकार देत त्यावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत आयसीसीने पाकिस्तानला पुनर्विचार करण्याविषयी सुनावलं आहे. भारत – पाकिस्तानमधील काही माजी क्रिकेटर्सकडून सुद्धा याबाबत प्रतिक्रिया देण्यात आली. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यानं पाकिस्तान सरकाराच्या निर्णयावर मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?
शाहिद आफ्रिदीने आपल्या एक्स हॅन्डलवर पोस्ट करत तो क्रिकेटला राजकारणापेक्षा वरती मानतो, पण तो पाकिस्तान सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देतो. शाहिद आफ्रिदीने लिहिले की, ‘क्रिकेट उन दरवाजांना खोल देते, पाहणे बंद करते. अफसोस है कि पाकिस्तान टी२० विश्व कप भारत के विरुद्ध खेळेगा नाही, पण मी आपल्या सरकारचे फॅसले समर्थन करतो’.

पाकिस्तान भारताविरुद्ध सामन्यावर बहिष्कार का टाकतोय?
बांगलादेशात हिंदूंवर वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे बांगलादेशचा क्रिकेटर मुस्तफिजूर रहमान याला आयपीएल 2026 मध्ये खेळायला देऊ नये अशी मागणी भारतीयांकडून विविध माध्यमांद्वारे केली जात होती. तेव्हा केकेआरने मुस्तफिजूर रहमानला रिलीज केलं. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या नाकाला मिर्च्या झोंबल्या आणि त्यानंतर त्यांनी याच्या निषधार्थ बांगलादेशात आयपीएलच्या प्रक्षेपणावर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला तसेच टी 20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात जाण्यास सुद्धा नकार दिला. बांगलादेशने खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि पत्रकार यांच्या सुरक्षेचं कारण पुढे करत भारतात वर्ल्ड कपचे सामने खेळण्यास नकार दिला. बांगलादेशचे सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात यावेत अशी मागणी केली. मात्र ही मागणी आयसीसीने फेटाळली. आयसीसीने वारंवार सांगून सुद्धा बांगलादेश त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिलं, यावेळी पाकिस्तानने सदर प्रकरणात हस्तक्षेप करून बांगलादेशची बाजू घेतली आणि त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला. मात्र आयसीसीने वर्ल्ड कपला काही दिवस शिल्लक असल्याने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर करत स्कॉटलंडला त्यांच्या ऐवजी संधी दिली.
आयसीसीने घेतलेला हा निर्णय पक्षपातीपणाचा आहे असं म्हणतं पाकिस्तानने त्यांच्या टी 20 वर्ल्ड कपमधील सहभागाबद्दल सुद्धा अनिश्चितता वर्तवली. पाकिस्तानने ते स्पर्धेत सहभागी होतील का नाही हा निर्णय राखून ठेवला होता. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी याविषयी चर्चा केली होती. सोमवारपर्यंत निर्णय देऊ असं सांगण्यात आलं होतं, दरम्यान रविवारी पाकिस्तान सरकारने टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागासंदर्भातील निर्णय जाहीर केला.
हेही वाचा : PCB आयसीसीला कोणतीही माहिती देणार नाही, बहिष्काराच्या धमकीनंतर टी20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानचा नवा ड्रामा
‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाला आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी मान्यता दिली आहे, मात्र पाकिस्तान क्रिकेट संघ 15 फेब्रुवारी 2026 रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यात मैदानात उतरणार नाही असं जाहीर केलंय. म्हणेजच भारताविरुद्ध सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकलेला आहे. यासंदर्भात आयसीसी काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
भारत आणि पाकिस्तान संघ एकाच ग्रुपमध्ये :
टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत एकूण 20 संघांचा सहभाग असणार आहे. या संघांना एकूण 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं असून यात ग्रुप ए मध्ये भारत आणि पाकिस्तान या संघांचा समावेश आहे. ग्रुप एमध्ये भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड, नामिबिया असे पाच संघ असून हे एकमेकांविरुद्ध ग्रुप स्टेज सामना खेळतील. यापैकी 15 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ग्रुप स्टेज सामना हा श्रीलंकेच्या कोलंबो येथे होणार होता. मात्र याच सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून हा सामना खेळण्यास नकार दिला आहे. आता यावर आयसीसी काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.






























