रणजी करंडक २०२६: मुंबईतील रणजी ट्रॉफी सामन्यात एक अनोखी आणि चिंताजनक परिस्थिती पाहायला मिळाली. बांद्रा–कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील बांधकामामुळे उडणाऱ्या धुळीने सामना थेट प्रभावित केला. प्रदूषण इतके वाढले की मैदानावर खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना श्वास घेणे कठीण झाले आणि काही खेळाडूंनी थेट मास्क घालून फील्डिंग करणे पसंत केले. दिल्लीविरुद्धच्या सामन्याच्या शेवटच्या सत्रात गुरुवारी अचानक संपूर्ण मैदान धुळीच्या ढगांनी व्यापले. यावेळी मुंबई संघाचे अनेक खेळाडू मास्क घालून मैदानात उतरले, ही दृश्ये प्रेक्षकांसाठीही धक्कादायक ठरली.
सरफराज, मुशीरसह खेळाडूंना मास्कचा आधार
धुळीमुळे वातावरण इतके बिघडले की टीम इंडियाचा स्टार फलंदाज सरफराज खान, त्याचा भाऊ मुशीर खान आणि ऑफस्पिनर हिमांशू सिंग यांना जवळपास अर्धा तास मास्क लावून फील्डिंग करावी लागली. केवळ खेळाडूच नव्हे, तर ड्रेसिंग रूमच्या बाहेर बसलेले सपोर्ट स्टाफचे सदस्यही मास्क लावलेले दिसून आले. परिस्थिती इतकी गंभीर होती की प्रतिस्पर्धी दिल्ली संघातील काही खेळाडूंनीही मुंबई संघाकडे मास्कची मागणी केली. मैदानात धाव घेताना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे तक्रार
या संपूर्ण प्रकारानंतर मुंबई संघ व्यवस्थापनाने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (MCA) लेखी तक्रार सादर केली आहे. प्रदूषणाची पातळी धोकादायक मर्यादेत पोहोचल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी (MPCB) चर्चा करून जवळील बांधकामांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
आकडेवारीनुसार, गुरुवारी संध्याकाळी BKC परिसरातील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 156 नोंदवण्यात आला, जो वैद्यकीय निकषांनुसार ‘अस्वास्थ्यकर’ श्रेणीत मोडतो.
सामन्याची स्थिती
प्रदूषण आणि धुळीच्या वातावरणात खेळ सुरू असतानाच दिल्लीचा संघ पहिल्या डावात 221 धावांवर बाद झाला. दिल्लीकडून सलामीवीर सनत संघवानने दमदार फलंदाजी करत 218 चेंडूंमध्ये 118 धावांची शानदार शतकी खेळी साकारली. मुंबईकडून वेगवान गोलंदाज मोहित अवस्थीने उत्कृष्ट कामगिरी करत 62 धावांत 5 बळी घेतले. सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना मोहित अवस्थीनेही बांधकामातून उडणाऱ्या धुळीमुळे खेळाडूंना मास्क घालण्याची वेळ आल्याचे मान्य केले.
खराब प्रकाशमानामुळे दिवसाचा खेळ ठरलेल्या वेळेआधीच काही मिनिटे थांबवण्यात आला. तोपर्यंत मुंबईने 1 गडी गमावून 13 धावा केल्या होत्या.





























