सीआरएस मारक म्हणजे काय: इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरक्षित असण्यासाठी त्यावर योग्य प्रमाणपत्र असणे गरजेचे असते. यासाठी भारतात Compulsory Registration Scheme म्हणजेच CRS लागू करण्यात आली आहे. BIS या संस्थेकडून ही योजना राबवली जाते.
आजच्या डिजिटल युगात मोबाइल फोन, चार्जर, इअरफोन, पावर बँक, लॅपटॉप असे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. घरात, ऑफिसमध्ये, प्रवासात प्रत्येक ठिकाणी ही उपकरणे वापरली जातात. अनेकदा स्वस्त ऑफर, सवलत किंवा लोकल दुकानात कमी किमतीत मिळत असल्यामुळे लोक घाईघाईने खरेदी करतात. मात्र अशा वेळी सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्यास पुढे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. इलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना केवळ किंमत किंवा ब्रँड न पाहता, त्या वस्तू सुरक्षित आहेत का याची खात्री करणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठीच CRS मार्ककडे लक्ष देणे गरजेचे ठरते.
CRS मार्क म्हणजे नेमकं काय?
CRS म्हणजे Compulsory Registration Scheme. ही योजना भारतीय मानक ब्यूरो म्हणजेच BIS मार्फत राबवली जाते. या योजनेअंतर्गत काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंना ठराविक सुरक्षा चाचण्या पार कराव्या लागतात. मोबाइल, चार्जर, पावर बँक, टीव्ही, लॅपटॉप यांसारख्या वस्तू या नियमांत येतात. सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतरच त्या प्रोडक्टला CRS नोंदणी मिळते.
हा मार्क का महत्त्वाचा आहे?
CRS मार्क असलेली वस्तू सुरक्षित मानकांनुसार तयार करण्यात आली आहे, याची खात्री मिळते. यामुळे शॉर्ट सर्किट, गरम होणे, बॅटरी फुगणे किंवा फुटणे, करंट लागणे अशा धोक्यांचा धोका कमी होतो. विशेषतः चार्जर आणि पावर बँकसारखी उपकरणे खराब दर्जाची असतील तर ती मोबाईलसह वापरकर्त्यासाठीही घातक ठरू शकतात.
CRS नसल्यास काय धोके संभवतात?
CRS मार्क नसलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरल्यास फोन लवकर बिघडू शकतो. बॅटरीची क्षमता कमी होते आणि अचानक आग लागण्याच्या घटना घडू शकतात. अनेक वेळा बनावट चार्जरमुळे घरात आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शिवाय अशा प्रोडक्ट्सवर योग्य वॉरंटी किंवा तक्रार निवारणाची सुविधा मिळत नाही.
CRS मार्क कसा ओळखायचा?
कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या बॉक्सवर किंवा डिव्हाइसच्या मागील बाजूस BIS लोगो आणि CRS नोंदणी क्रमांक दिलेला असतो. हा क्रमांक BIS च्या अधिकृत वेबसाइटवर तपासता येतो. ऑनलाइन खरेदी करताना प्रोडक्टच्या माहितीमध्ये BIS किंवा CRS सर्टिफिकेशनचा उल्लेख आहे का, हे पाहणे गरजेचे आहे.
खरेदी करताना घ्यायची काळजी
नेहमी विश्वासार्ह ब्रँड आणि अधिकृत दुकानदारांकडूनच इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा. फारच कमी किमतीच्या आमिषाला बळी पडू नका. मोबाइल, चार्जर किंवा इतर कोणतेही उपकरण घेताना त्यावर CRS मार्क आहे की नाही, हे तपासणे सवयीत आणा. थोडीशी जागरूकता तुम्हाला आर्थिक नुकसान आणि संभाव्य अपघातांपासून वाचवू शकते.





























