अदार पूनावाला आरसीबी फ्रँचायझी घेणार: आयपीएलचा नवीन सीजन लवकरच सुरु होणार आहे. याआधी अनेक चर्चांना उधाण आले आहे. मागील सिजनमध्ये तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच आयपीएल विजेतेपद RCB ने जिंकले. आता आयपीएलमधील सर्वाधिक लोकप्रिय संघांपैकी एक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विषयी मोठी बातमी समोर आली आहे. मागील सीजन जिंकणाऱ्या RCB ची फ्रँचायझी विक्रीसाठी उपलब्ध होण्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये एका व्यक्तीच्या ट्विटने आता भर पडली आहे. ही व्यक्ती पुणेकर आहे आणि आता RCB चे मालकही होऊ शकतात. ही व्यक्ती दुसरी कोणती नसून आहे अदार पूनावाला! आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे CEO अदार पूनावाला यांच्या एका ट्वीटमुळे नवे वळण मिळाले आहे.
फ्रँचायझी विक्रीच्या चर्चांना वेग
सध्या RCB चे मालकी हक्क दारूचे उत्पादन करणाऱ्या डियाजिओ कंपनीकडे आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डियाजिओ 31 मार्चपर्यंत ही फ्रँचायझी विकण्याच्या विचारात आहे. आयपीएल 2025 मध्ये जेतेपद मिळाल्यानंतर काही दिवसांतच RCB विकली जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता त्या चर्चांना अदार पूनावालांच्या ट्वीटने अधिकच बळ दिले आहे.
अदार पूनावालांचे ट्वीट काय?
अदार पूनावालांनी त्यांच्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर लिहिले की, “पुढील काही महिन्यांत आयपीएलमधील सर्वोत्तम संघांपैकी एक असलेल्या RCB साठी मी मजबूत आणि स्पर्धात्मक बोली लावणार आहे.” या एका ओळीनेच क्रिकेटविश्वात आणि सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. RCB ने जरी आतापर्यंत एकदाच आयपीएल जिंकला असला, तरी संघाचा चाहता वर्ग मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससारख्या पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या संघांनाही टक्कर देणारा आहे.
पुढील काही महिन्यांत, साठी मजबूत आणि स्पर्धात्मक बोली लावली जाईल @RCBTweetsआयपीएलमधील सर्वोत्तम संघांपैकी एक.
— अदार पूनावाला (@adarpoonawalla) 22 जानेवारी 2026
2025 मध्ये चॅम्पियन बनूनही RCB का विकली जात आहे?
RCB च्या चाहत्यांना सध्या एकच प्रश्न सतावत आहे की, इतकी वर्षे वाट पाहून आयपीएलचे जेतेपद मिळाल्यानंतरही डियाजिओ ही कंपनी संघ विकण्याच्या तयारीत का आहे? तर यामागे भावनिक नव्हे, तर व्यावसायिक आणि धोरणात्मक कारणे आहेत. डियाजिओच्या नव्या कॉर्पोरेट धोरणानुसार, आयपीएलसारख्या क्रीडा फ्रँचायझी त्यांच्या मुख्य व्यवसायाशी सुसंगत नाहीत. अल्कोहोल उत्पादनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या कंपनीसाठी क्रिकेट संघाची मालकी ठेवणे ही दीर्घकालीन रणनीतीचा भाग राहिलेली नाही, हे कंपनीने स्पष्ट संकेत दिले आहेत.
RCB ची किंमत 2 अब्ज डॉलर्स?
याशिवाय, आयपीएल 2025 मधील ऐतिहासिक विजयामुळे RCB ची बाजारातील किंमत सध्या खूप जास्त आहे. अशा टप्प्यावर संघ विकल्यास मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो, आणि त्यामुळेच योग्य वेळ साधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जात असल्याचे मानले जात आहे. डियाजिओने RCB साठी २ अब्ज डॉलर्स (सुमारे १७,५०० कोटी रुपये) इतकी मोठी किंमत मागितली आहे. ही किंमत गुजरात टायटन्स किंवा लखनौ सुपर जायंट्सच्या विक्री किमतीपेक्षा कितीतरी जास्त आहे.





























