बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय आणि सुसंस्कृत जोडपं म्हणून ओळखले जाणारे राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वी नवा आनंदाचा क्षण अवतरला. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशीच दोघांच्या घरी लेकीचं आगमन झालं, त्यामुळे हा दिवस त्यांच्या आयुष्यात कायमचा अविस्मरणीय ठरला आहे.
लेकीच्या जन्मानंतर काही दिवसांनी आज राजकुमार आणि पत्रलेखा यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत लेकीच्या बारशाची माहिती दिली. या पोस्टमध्ये दोघेही आपल्या लेकीचा चिमुकला हात हातात धरलेला दिसत आहेत. या साध्या पण मनाला भिडणाऱ्या फोटोतूनच त्यांनी चाहत्यांशी आपला आनंद शेअर केला आहे.
‘पार्वती पॉल राव’ नावाचा उलगडा
या खास पोस्टसोबतच राजकुमार आणि पत्रलेखाने लेकीचं नाव अधिकृतपणे जाहीर केलं. दोघांनी आपल्या लेकीसाठी ‘पार्वती पॉल राव’ हे सुंदर, अर्थपूर्ण आणि पारंपरिक नाव निवडलं आहे. राजकुमारने पोस्टमध्ये लिहिलं, ‘अत्यंत नम्रपणे हात जोडून आणि मनापासून आम्ही आमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या आशीर्वादाची तुम्हाला ओळख करून देत आहोत पार्वती पॉल राव.’
या शब्दांतून दोघांची भावना आणि आनंद स्पष्टपणे दिसून येतो.
साधं नाव, मोठा अर्थ
सध्या सेलिब्रिटी विश्वात मुलांसाठी विचित्र, वेगळ्या आणि उच्चारायला अवघड नावांचा ट्रेंड दिसत असताना, राजकुमार आणि पत्रलेखाने आपल्या लेकीसाठी साधं, पारंपरिक आणि अर्थपूर्ण नाव निवडल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. ‘पार्वती’ हे नाव भारतीय संस्कृतीत शक्ती, मातृत्व आणि करुणेचं प्रतीक मानलं जातं.
‘पॉल’ आडनावामागील कारण
दरम्यान, अनेक चाहत्यांना ‘पार्वती पॉल राव’ या नावातील ‘पॉल’ हे आडनाव कुणाचं, असा प्रश्न पडला होता. यावर स्पष्टीकरण देताना सांगण्यात आलं की, पत्रलेखाचं मूळ आडनाव पॉल आहे. पत्नीच्या ओळखीचा आणि सन्मानाचा भाग म्हणून राजकुमारने हे आडनाव लेकीच्या नावात समाविष्ट केलं आहे. त्यानंतर स्वतःचं आडनाव राव शेवटी जोडण्यात आलं आहे. या निर्णयाचंही सर्वत्र कौतुक होत आहे.
शुभेच्छांचा वर्षाव
राजकुमार आणि पत्रलेखा यांच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. लेकीच्या आगमनामुळे त्यांच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू झाला असून, या आनंदाच्या क्षणासाठी सर्वजण या जोडप्याचं अभिनंदन करत आहेत. राजकुमार आणि पत्रलेखा यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यांच्या लेकीला मिळणाऱ्या प्रेमामुळे हा आनंदाचा क्षण आणखी खास ठरत आहे.





























