मुस्तफिजुर रहमानने केकेआरविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिला: आयपीएल 2026 (IPL 2026) च्या मिनी ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला 9.20 कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र काही दिवसांतच त्याला संघातून रिलीज करण्यात आले. या निर्णयानंतर मुस्तफिजूर KKR विरोधात कायदेशीर पाऊल उचलणार का, याबाबत चर्चा सुरू होती. पण आता स्वतः खेळाडूनेच ही शक्यता फेटाळली आहे.
कायदेशीर लढाई नको, मुस्तफिजूरचा स्पष्ट निर्णय
बांगलादेश क्रिकेटर्स वेल्फेअर असोसिएशन (CWAB) चे अध्यक्ष मोहम्मद मिथुन यांनी सांगितले की, KKR विरोधात कायदेशीर किंवा प्रशासकीय मार्ग अवलंबण्याचा विचार झाला होता. मात्र मुस्तफिजूर रहमाननेच अशा कोणत्याही कारवाईस नकार दिला. भारत-बांगलादेश दरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांमुळे भारतात काही संघटनांनी विरोध दर्शवला. या पार्श्वभूमीवर BCCI ने KKR ला सूचना दिल्यानंतर फ्रँचायझीने मुस्तफिजूरला संघातून मुक्त केले.
30 वर्षीय मुस्तफिजूरने 2016 मध्ये IPL मध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने 60 सामने खेळत 8.13 इकॉनॉमीने गोलंदाजी करत 65 विकेट्स घेतल्या आहेत.
वर्ल्ड कपसाठी भारतात येण्यावरून बांगलादेशचा आक्षेप
या प्रकरणानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) मोठा निर्णय घेतला आहे. ICC टी20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतात येण्यास त्यांनी सुरक्षेचे कारण देत नकार दिला आहे. बांगलादेशची मागणी आहे की त्यांचे सामने भारताबाहेर आयोजित करण्यात यावेत. मात्र ICC ने BCB ला आपली भूमिका पुन्हा विचारात घेण्यास सांगितले आहे.
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये बांगलादेश ग्रुप C मध्ये आहे. इंग्लंड, वेस्ट इंडीज, नेपाळ आणि इटली हे संघही या गटात आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार बांगलादेशचे तीन सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर, तर एक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आता बांगलादेशचा संघ भारतात येणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






























