पार्वती तिरुवोथु: लोकप्रिय अभिनेत्रींच्या झगमगत्या आयुष्यामागे अनेकदा कठीण अनुभव लपलेले असतात. चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यासाठी कलाकारांना फक्त मेहनतच नाही, तर मानसिक आणि शारीरिक त्रासालाही सामोरं जावं लागतं. विशेषतः महिला अभिनेत्रींना शूटिंगदरम्यान अनेक अडचणी सहन कराव्या लागतात. असाच एक धक्कादायक अनुभव मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पार्वती तिरुवोथूने अलीकडेच शेअर केला आहे, जो ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.
शूटिंगदरम्यानचा त्रासदायक अनुभव
एका मुलाखतीदरम्यान पार्वतीने सांगितले की, एका तमिळ चित्रपटाच्या शूटिंगवेळी तिला अतिशय अस्वस्थ करणारा प्रसंग अनुभवावा लागला. त्या वेळी ती मासिक पाळीत होती, तरीही तिला शूटिंग थांबवता आलं नाही. चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी तिला अभिनेता धनुषसोबत पाण्यात भिजत रोमँटिक सीन शूट करावा लागला. सतत पाण्यात भिजल्यामुळे तिची प्रकृती आणखी बिघडत होती, मात्र सेटवर तिच्या अडचणींकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही.
कपडे बदलण्यालाही नकार
पार्वतीने पुढे सांगितले की, शूटिंगनंतर तिच्याकडे बदलण्यासाठी कोरडे कपडेही नव्हते. तिने दिग्दर्शकाकडे हॉटेलमध्ये जाऊन कपडे बदलण्याची परवानगी मागितली, पण तिला नकार देण्यात आला. अखेर तिला आपली परिस्थिती स्पष्ट करत आपण मासिक पाळीत असल्याचं सांगावं लागलं. ही गोष्ट तिच्यासाठी मानसिकदृष्ट्या खूप त्रासदायक होती, कारण अशा वैयक्तिक गोष्टी सांगायला तिला भाग पाडण्यात आलं.
घरातील अनुभवही मांडले
या मुलाखतीत पार्वतीने फक्त शूटिंगचा अनुभवच नाही, तर घरातील काही आठवणीही शेअर केल्या. तिने सांगितले की, लहानपणी मासिक पाळीबाबत घरात मोकळेपणाने बोललं जात नव्हतं. त्या काळात तिला वेगळं बसायला सांगितलं जायचं आणि अनेक गोष्टींवर निर्बंध होते. या अनुभवांमुळे तिच्यावर मानसिक परिणाम झाला, असंही तिने नमूद केलं.
मर्यन चित्रपटाबद्दल…
पार्वती आणि धनुष यांचा मर्यन हा तमिळ चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दोघांची मुख्य भूमिका होती आणि तो प्रेक्षकांनी चांगलाच पसंत केला होता. मात्र पडद्यामागील अनुभव मात्र अभिनेत्रीकरिता वेदनादायक ठरले.
हे ही वाचा: ‘कधी माझ्या छातीवर तर कधी मागे…’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं बालपणी झालेलं शोषण; ‘अजूनही…’
वर्क फ्रंट आणि पुढील प्रोजेक्ट्स
पार्वतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने आजवर टेक ऑफ, उयिरे, करीब करीब सिंगल, चार्ली, मर्यन आणि बेंगलोर डेज यांसारख्या चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या आहेत. येत्या काळात ती ऋतिक रोशनच्या HRX फिल्म्स अंतर्गत तयार होत असलेल्या द स्टॉर्म या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. तिच्या या अनुभवामुळे पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीतील महिलांच्या अडचणींवर चर्चा सुरू झाली आहे.






























