स्वित्झर्लंडच्या बारमध्ये स्फोट स्वित्झर्लंडमधील क्रान्स मॉन्टाना येथील बारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 40 जण ठार झाले असून 100 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी गुरुवारी पहाटे दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान क्रान्स मॉन्टाना या आलिशान आल्पाइन स्की रिसॉर्ट शहरातील ‘ले कॉन्स्टेलेशन’ नावाच्या बारमध्ये हा स्फोट झाला.
“स्फोटाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. यात 100 जण जखमी झाले असून, 40 जणांचा मृत्यू झाला आहे,” असं दक्षिण-पश्चिम स्वित्झर्लंडमधील वालिस कँटनचे पोलीस प्रवक्ते गॅटन लॅथिऑन यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले. नवीन वर्षाचे स्वागत करत असताना, पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या कॉन्स्टेलेशन बारमध्ये मध्यरात्री सुमारे 1.30 वाजताहा स्फोट झाला.
‘बारमध्ये होते 100 हून अधिक लोक ‘
“मृत्यू झालेल्यांपैकी अनेक जण पर्यटक असल्याचं सांगितलं जात आहे, जे सुट्ट्यांसाठी क्रान्स-माँटाना येथे आले होते. स्फोटाच्या वेळी बारमध्ये शंभरहून अधिक लोक आतमध्ये होते,” असं पोलीस प्रवक्त्याने सांगितलं आहे. “आम्ही आमच्या तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत, पण हे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्की रिसॉर्ट आहे, जिथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात,” असंही ते पुढे म्हणाले.
आगीचा व्हिडिओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत काही अस्पष्ट फोटो आणि व्हिडिओंमध्ये बारमध्ये आग लागलेली दिसत आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलासोबतच अनेक हेलिकॉप्टरही दाखल झाले होते. पीडितांच्या नातेवाईकांसाठी एक हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.
परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला असून, क्रॅन्स-माँटानावर ‘नो-फ्लाय झोन’ लागू करण्यात आला आहे, असं पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे. स्विस वृत्तसंस्था ‘ब्लिक’ने दिलेल्या वृत्तानुसार, एका कॉन्सर्टदरम्यान फटाक्यांमुळे आग लागली असावी. तथापि, पोलिसांनी आगीचे कारण स्पष्ट झालं नसल्याचं म्हटलं आहे.
क्रॅन्स-मॉन्टाना स्की रिसॉर्ट बद्दल
क्रान्स-माँटाना हे स्वित्झर्लंडची राजधानी बर्नपासून सुमारे दोन तासांच्या अंतरावर, व्हॅले प्रदेशातील आल्प्स पर्वतांच्या मध्यभागी वसलेले एक आलिशान स्की रिसॉर्ट शहर आहे. 87 मैल लांबीच्या ट्रेल्स असलेल्या हे शहर ब्रिटिश पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. बीबीसीच्या माहितीनुसार, जानेवारीच्या अखेरीस क्रान्स-माँटाना रिसॉर्टमध्ये ‘एफआयएस वर्ल्ड कप’ नावाच्या स्पीड स्कीइंग स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.





















