महाराष्ट्र हवामान बातम्या: नव्या वर्षाची सुरुवात अतिशय उत्साहात झालेली असली तरीही याच नव्या वर्षापासून हवामानानंही अगदी पहिल्याच दिवसापासून तालरंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. एकिकडे थंडीचा कडाका वाढत आहे, तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा आणि कुठं चक्क जोरदार पाऊस बरसत असल्याचं चित्र आहे. ज्यामुळं देशात नेमका कोणता ऋतू सुरू आहे हाच प्रश्न अनेकांना पडल आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मागील 48 तासांपासून सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लेह लडाख, जम्मू काश्मीरसह काही मैदानी भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली असून, पुढील 24 तासांमध्येही पाऊस बरसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. इतकंच नव्हे, तर थंडीची लाटसुद्धा हाडं गोठवणार असल्यानं हे हवामानबदल चिंतेत भर टाकत आहे.
दिल्ली आणि पश्चिमी उत्तरप्रदेशातील काही भागांमध्ये ढगाळ वातारणाचा अंदाज असून, पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज राजस्थान, मध्य भारत आणि महाराष्ट्राच्याही किनारपट्टी भागांमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर, स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं पुढील 50 तासांचा अंदाज वर्तवत दक्षिण भारतामध्ये हवामानबदल होणार असून, तामिळनाडूसह बहुतांश भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्वोत्तर भारतही या पावसास अपवाद ठरणार नाही. देशाच्या चारही दिशांना असणाऱ्या या हवामान बदलांचे परिणाम महाराष्ट्रात होत असून, एकाच वेळी पाऊस, थंडी आणि ऊन अशी काहीशी स्थिती पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात पावसासह गारठा…
महाराष्ट्रात किनारपट्टी भागांमध्ये पावसाची हजेरी राहणार असून ,24 तासांमध्ये बहुतांशी वातावरण ढगाळ असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याचा इशारा आहे. उत्तर भारतात पाऊस आणि थंडीची लाट आणखी तीव्र होणार असल्यानं महाराष्ट्रात गारठा कायम असेल असा इशारा जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांनंतर मात्र राज्याच्या काही भागांमध्ये तापमानाच चढ-उतार अपेक्षित असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, (Mumbai Rain) मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 12 तास पावसाचा इशारा असून, त्यानंतर शहरात शीतलहरींचा वावर जाणवेल. तर, वातावरण काहीसं ढगाळ असेल असा प्राथमिक अंदाज आहे.
1 जानेवारी, देशभरात पावसाचा दिवस..
जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या पर्वतीय भागांमध्ये कुठं हाडं सुन्न करणारा पाऊस तर कुठं बर्फवृष्टीचा अंदाज आहे. थंडीची ही लाट तीव्र होत जाणार असल्यानं नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर, हिवाळ्यात धुक्यासह पावसाची हजेरी आणि गारठा जाणवणार असून, तामिळनाडू, लक्षद्वीप, कर्नाचकात वादळी पावसाचा इशारा आहे. दक्षिण भारतासह देशात पुढच्या 48 तासात अनेक हवामान बदल पाहायला मिळणार असून यंत्रणा या बदलांवर लक्ष ठेवून वेळोवेळी त्याबाबतची माहिती देत राहतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे.





















