सलमान खान युद्धाच्या गलवान टीझरवर चीनची संतप्त प्रतिक्रिया: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यानंतर चीनने संतप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे. चीनमधील सरकारी माध्यमांनी हा चित्रपट वस्तुस्थितीचे विकृतीकरण करत असल्याचा दावा केला आहे. सलमान खानची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट चित्रपट पूर्व लडाखमधील गलवान येथे 2020 मध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखियाने केलं आहे. चित्रपटात चित्रांगदा सिंग मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत असून झेन शॉ, अंकुर भाटिया आणि विपिन भारद्वाज यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात सलमान खान 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिक्कुमाला संतोष बाबू यांची भूमिका साकारत आहे. घुसखोरी करणाऱ्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सैनिकांशी लढताना ते शहीद झाले होते.
चिनी माध्यमांनी काय म्हटलं?
चीनच्या सरकारी वृत्तपत्र ‘Global Times’मधील एका लेखात आरोप करण्यात आला आहे की, चित्रपटात चित्रित केलेल्या जून 2020 च्या संघर्षाच्या घटना वस्तुस्थितीशी साधर्म्य असणाऱ्या नाहीत. तथाकथित तज्ज्ञांचा हवाला देत, “बॅटल ऑफ गलवान”ला एक “अतिशयोक्तीपूर्ण” चित्रपट आहे. तसंच संतोष बाबूंच्या बलिदानाचे शौर्य महत्त्वाचं नाही सांगत तेदेखील फेटाळलं आहे.
“बॉलिवूड चित्रपट जास्तीत जास्त मनोरंजन-केंद्रित, भावनिक चित्रण प्रदान करतात. परंतु कितीही सिनेमॅटिक अतिशयोक्ती केली तरी इतिहास पुन्हा लिहिला जाऊ शकत नाही किंवा चीनच्या सार्वभौम प्रदेशाचे रक्षण करण्याचा पीएलएचा निर्धार डगमगवला जाऊ शकत नाही,” असंही त्यात लिहिलं आहे.
भारतीय सरकारने काय उत्तर दिलं?
भारत सरकारने आमच्या देशात “अभिव्यक्ती स्वातंत्र्य” आहे आणि चित्रपट निर्मात्यांना या स्वातंत्र्याचा वापर करून चित्रपट बनवण्याचा अधिकार आहे असं सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे. सरकारने अधिकृतपणे कबूल केलं आहे की, त्या संघर्षात भारताचे 20 सैनिक शहीद झाले. याउलट, बीजिंगने सुरुवातीला या संघर्षात कोणतीही जीवितहानी झाल्याचे नाकारलं होतं. परंतु नंतर त्यांनी आपले चार सैनिक मारले गेल्याचा दावा केला.
“भारत हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा देश आहे आणि सिनेमॅटिक अभिव्यक्ती हा त्याचा अविभाज्य भाग आहे. भारतीय चित्रपट निर्माते या कलात्मक स्वातंत्र्यानुसार चित्रपट बनवण्यासाठी स्वतंत्र आहेत,” असं सरकारने चीनला ठणकावून सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे. “ज्यांना या विशिष्ट चित्रपटाबद्दल काही चिंता असेल, ते कोणत्याही स्पष्टीकरणासाठी भारताच्या संरक्षण मंत्रालयाशी संपर्क साधण्यास स्वतंत्र आहेत. या चित्रपटात सरकारची कोणतीही भूमिका नाही,” असंही सूत्रांनी सांगितलं आहे.
या संघर्षानंतर भारत आणि चीनमधील तणाव वाढला होता. ज्यामुळे भारतीय लष्कराने लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) गलवान खोऱ्याजवळ सैन्य तुकड्या तैनात केल्या आणि संभाव्य चिनी आक्रमणाला प्रतिबंध करण्यासाठी सीमावर्ती भागांचे सर्वेक्षण करण्यासारख्या कारवाया हाती घेतल्या.
ग्लोबल टाइम्सच्या लेखात असा खोटा दावा करण्यात आला आहे की, गलवान खोरे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) चिनी बाजूला आहे. जून 2020 च्या संघर्षासाठी त्यांनी भारताला जबाबदार धरत असा दावा केला आहे की भारतीय सैनिकांनी नियंत्रण रेषा ओलांडली आणि संघर्षाला चिथावणी दिली.





















