30 वर्षे जुने UTI बॉन्ड्सची सध्याची किंमत: आपल्या पूर्वजांनी ठेवलेली संपत्ती किंवा जमिनीचे कागद अचानक सापडल्याच्या बातम्या यापूर्वी तुम्ही अनेकदा वाचल्या असतील किंवा पाहिल्या असतील. मात्र जमिनी किंवा घरांची अशी जुनी कागदपत्रं सापडून अचानक श्रीमंत होण्यामध्ये एका तरुणाने सगळ्यांनाच मागे टाकलं आहे. या व्यक्तीला त्याच्या घरात जमिनी आणि संपत्तीचे नाही तर शेअर्स खरेदीसंदर्भातील कागदपत्रं सापडली. 1995 मध्ये खरेदी केलेल्या या बॉण्ड्सचे सर्टिफिकेट आपल्याला सापडल्याचं या व्यक्तीने ‘रेडिट’ या प्लॅटफॉर्मवर शेअर केलं आहे. सामान्यपणे कोणालाही प्रश्न पडावा त्याप्रमाणे त्यालाही प्रश्न पडला की याची आता काय किंमत असेल. हेच जाणून घेण्यासाठी त्याने घडलेला प्रकार सोशल मीडियावर शेअर केला. त्यावर आलेली उत्तरं पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला.
हा बाँड सध्या चर्चेचा विषय
माझ्या काकांना जुन्या फाईल्स चाळताना 1995 मध्ये खरेदी केलेला बाँड सापडला. खरेदी करुन विसरुन गेलेल्या या बाँडची किंमत किती असेल याबद्दल त्यांना आणि मलाही उत्सुकता लागलेली आहे असं या व्यक्तीने माहिती देताना म्हटलं. या बॉण्डची तेव्हाची किंमत 20 हजारांच्या आसपास होती. मात्र महागाईचा दर आणि इतर हिशोब करुन अनेकांनी असे सुचवले की आता या बाँड्सची किंमत लाखांमध्ये असेल. काहींनी तर अंदाज लावला की ही किंमत काही कोटींमध्येही जाऊ शकते. हा बाँड सध्या रेडिटवर चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र याची मूळ किंमत किती या प्रश्नाला वेगवेगळे लोक वेगवेगळे तर्क लावून उत्तरं देत आहेत.
बाँडसंदर्भात कोणती माहिती मिळाली?
“माझ्या काकाला काही कागदपत्रे शोधत असताना हे सापडले. आज त्याचे मूल्य काय असेल?” असं या बॉण्ड पेपरचा फोटो शेअर करत रेडिट युझरने विचारलं. त्याने शेअर केलेला फोटो हा युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या (UTI) बाँड आहे. कागदपत्रात असंही म्हटले आहे की सदर बाँड हे अहस्तांतरणीय आहे आणि रिटायरमेंट बेनिफिट प्लॅनअंतर्गत जारी केले गेले आहे. या दस्तऐवजानुसार, त्या व्यक्तीने 20 हजार युनिट्स खरेदी केले होते. प्रत्येक युनिटची दर्शनी किंमत 10 रुपये इतकी होती. हा बाँड 1995 मध्ये मुंबईमधून जारी करण्यात आलेला.
लोकांनी सांगितली वेगवेगळी किंमत
रेडिट वापरकर्त्यांनी आपआपल्या पद्धतीने हिशोब लावून वेगवेगळी किंमत सांगायला सुरुवात केली. एका रेडिट युझरने सांगितले की या बाँडचे सध्याचे मूल्य 23 लाख रुपये आहे. दुसऱ्याने सुचवले की ते आता या बाँडची किंमत सात कोटी असू शकते. पण खरोखरच तसे आहे का? या बॉण्डची सध्याची किंमत नेमकी किती हे आपण खाली समजून घेऊयात…
यूटीआय बाँड खरोखरच किती रुपयांचा आहे?
रेडिटवर आज हा बाँड काही कोटी रुपयांचा असल्याची चर्चा असताना प्रत्यक्षातील आकडे खूप वेगळी गोष्ट सांगतात. 12 डिसेंबर 2025 पर्यंत सुमारे 50.71 रुपयांच्या सध्याच्या निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) वर आधारित, आजची गुंतवणूक ही एक लाख रुपयांपेक्षा थोडी जास्त आहे. 30 वर्षांत ती मूळ रकमेच्या पाच पट वाढली असली तरी, ती अगदी कोट्यवधींच्या आसपासही नाही. आकड्याच्या जवळपासही नाही.
लोकांनी आपली आकडेमोड वापरुन या बाँडची किंमत कोट्यवधी असेल असं तर्क मांडलं असलं तरी या बाँडची खरी किंमत फक्त एक लाख रुपये इतकी आहे. कसं ते समजून घेऊयात…
1- 1995 मध्ये, त्या माणसाने 2000 युनिट्स खरेदी केले, ज्यामध्ये प्रत्येक युनिटची दर्शनी किंमत 10 रुपये असल्याने 20000 रुपये गुंतवले.
2- जर आपण डिसेंबर 2025 पर्यंत चालू किंमत (NAV) मोजली तर ती 50.71 रुपये आहे.
3- म्हणून, 2 हजार युनिट्सना सध्याच्या मूल्याने गुणाकार केला तर ती 1,01,420 रुपये आहे.





















