चायना कंपनी गिफ्ट हाऊस: चीनमधील झेजियांग गुओशेंग ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी नावाच्या ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून महागडे फ्लॅट्स देण्याची खास योजना सुरू केलीय. चांगले आणि कुशल कर्मचारी कंपनीत दीर्घकाळ टिकावेत यासाठी कंपनीने हे पाऊल उचललंय. एकूण 450 कर्मचारी असलेल्या या कंपनीने 2024 मध्ये 70 मिलियन डॉलरची उलाढाल केली होती. असे फायदे देऊन कर्मचाऱ्यांमध्ये स्थिरता येईल आणि ते अधिक चांगले काम करतील, असा कंपनीला विश्वास आहे.
फ्लॅट्सची किंमत
कंपनी कर्मचाऱ्यांना 1.3 कोटी ते 1.5 कोटी रुपयांपर्यंत किंमतीचे फ्लॅट्स भेट म्हणून देतेय. हे फ्लॅट्स 1076 ते 1615 चौरस फूट आकाराचे आहेत. म्हणजेच एका कर्मचारी दांपत्याला 1550 चौरस फूटाचा फ्लॅट मिळालाय. हे फ्लॅट्स कंपनीच्या कारखान्यापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहेत. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना ये-जा करणे सोयीचे होते. स्थानिक बाजारात अशा फ्लॅट्सची किंमत खूप जास्त असते, त्यामुळे हे कर्मचाऱ्यांसाठी मोठे गिफ्ट ठरणार आहे.
कसे होणार वाटप?
कंपनीने एकूण 18 फ्लॅट्स वाटप करण्याचे ठरवले आहे. यंदा 2025 मध्ये 5 फ्लॅट्स देण्यात आले आहेत. पुढच्या वर्षी 8 फ्लॅट्स देणार आहेत आणि पुढील तीन वर्षांत उरलेले फ्लॅट्स देण्यात येतील. हे फ्लॅट्स कंपनीच्या औद्योगिक भागाजवळील नवीन इमारतीत आहेत. ही योजना लॉंग टर्म विचार करुन बनवण्यात आलीय. यामुळे कर्मचारी कंपनीशी जोडले राहतील आणि नवीन कौशल्ये शिकतील, असा विश्वास कंपनी व्यवस्थापकांकडून व्यक्त केला जातोय.
पात्रतेसाठीच्या अटी काय?
हे फ्लॅट्स मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याने कंपनीत किमान तीन वर्षे काम केलेले असावे. मात्र फ्लॅटचा पूर्ण मालकी हक्क मिळण्यासाठी 5 वर्षांची अधिकृत सेवा पूर्ण करावी लागते. फ्लॅट देण्यापूर्वी कंपनी एक करार करून घेते, ज्यात सेवा कालावधी आणि फ्लॅट हस्तांतरणाच्या नियमांचा समावेश असतो. ही योजना मुख्यतः कुशल तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आहे.
योजनेचे महत्त्व काय?
अशा प्रकारचे फायदे देऊन कंपनी कर्मचाऱ्यांना घराचे स्वप्न पूर्ण करतेय. जे विशेषतः परदेशी किंवा दूर राहणाऱ्या कामगारांसाठी फायदेशीर आहे. कंपनीच्या या पावलामुळे कर्मचाऱ्यांची निष्ठा वाढवेल आणि कंपनीची प्रगती होईल, असा विश्वास कंपनीचे जनरल मॅनेजर वांग जियायुआन यांना वाटतोय. जगात अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देतात, पण एवढ्या मोठ्या रकमेचे घर भेट देणे ही दुर्मीळ बाब आहे.





















