Kainchi Dham mahindra scorpio Road Accident : पर्यटन आणि देवदर्शनाच्या निमित्तानं सध्या अनेक मंडळी विविध राज्यांमध्ये, गिरीस्थानांवर आणि देवदर्शनासाठी तीर्थक्षेत्रांच्या दिशेनं रवाना होत आहेत. अशाच एका अनेकांसाठी श्रद्धास्थानी असणाऱ्या तीर्थस्थळी निघालेल्या भाविकांना वाटेतच मृत्यूनं गाठल्याचं मन विचलित करणारं वृत्त नुकतंच समोर आलं. ज्यामध्ये रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू ओढावला.
कुठं घडला हा भीषण अपघात?
उत्तराखंडमधील प्रसिद्ध अशा कैंची धामच्या दिशेनं निघालं असता बुधवार (18 डिसेंबर 2025) भाविकांच्या वाहनाचा भयावह अपघात झाला. पिलीभीत इथून कैंची धामसाठी रवाना झालेल्या या भाविकांच्या कारचा अल्मोडा- भवाली राष्ट्रीय महामार्गावरील निगलाट इथं भीषण अपघात झाला. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्यानंतर कार थेट खोल दरीत कोसळली आणि यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक स्वरुपात समोर आली.
अपघाताचा घटनाक्रम धडकी भरवणारा…
बरेली येथील पिलीभीत क्षेत्रातून काही भाविक महिंद्रा स्कॉर्पिओ या कारनं कैंची धामच्या दर्शनासाठी निघाले होते. पण, भवाली–अल्मोड़ा राष्ट्रीय महामार्गावर निगलाट इथं एकाएकी वाहनचालकानं वाहनावरील नियंत्रण गमावलं आणि त्यामुळं कार रस्त्यावरून थेट दरीत कोसळली. ही दरी अतिशय खोल असल्यामुळं कार अचतिप्रचंड वेगानं खालच्या दिशेनं कोसळली. आदळत गेल्यामुळं तिचा चुराडा झाला. ज्यामध्ये स्कॉर्पिओतील सर्व प्रवासी गंभीररित्या दुखापतग्रस्त झाले.
नैनिताल, उत्तराखंड: बरेलीहून कांची धामकडे पर्यटकांना घेऊन जाणारी स्कॉर्पिओ गाडी 50 फूट दरीत कोसळली, यात दोन महिला आणि एका बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर पोलीस आणि एसडीआरएफने जखमींना वाचवून उपचारासाठी नेले. pic.twitter.com/yL1r2OREup
— IANS (@ians_india) १८ डिसेंबर २०२५
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. ज्यानंतर तातडीनं पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीनं दरीत कोसळलेली कार आणि अपघातग्रस्तांना बाहेर काढलं. ज्यानंतर प्रथमोपचारासाठी जखमींना भवाली येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पोलिसांच्या माहितीनुसार एकूण 8 जण या कारनं प्रवास करत होते. ज्यामध्ये ऋषी पटेल (7) पुत्र राहुल पटेल निवासी बरेली एयरपोर्ट, एयरफोर्स पीलीभीत रोड इज्जतनगर, स्वाती (20) पुत्री भूपराम, अक्षय (20) पुत्र चंदन सिंह पटेल, ज्योती (25), करण (25), जितेंद्र आणि राहुल पटेल (35) गंगा देवी (56), बृजेश कुमारी (26), राहुल पटेल आणि नँन्सी गंगवार (24) अशी प्रवाशांची नावं समोर आली आहेत.
अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता, की रुग्णालयात पोहोचण्याआधीच घटनास्थळी गंगा देवी, नँन्सी गंगवार आणि बृजेश कुमारी यांचा मृत्यू ओढावला होता. तर, उर्वरित पाच प्रवाशांना प्रथमोपचारानंतर हल्द्वानी येथील अद्ययावत रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळं पुन्हा एकदा पर्वतीय भागांमध्ये वळणवाटांवरून प्रवास करत असताना सर्व सुरक्षेची तरतूद करत सावधगिरीनंच प्रवास करण्याचा सल्ला यंत्रणांनी दिला.





















