अद्वितीय विवाह परंपरा: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे सर्व जाती धर्माचे लोक दिसतील. प्रत्येकाच्या प्रथा पंरपरा वेगळ्या असतात. अशीच एक पंरपरा भारतातील एका राज्यात आहे. जिथे स्त्रीला तिच्या आवडीचा पुरुष जीवनसाथी म्हणून निवडण्याचा अधिकार असतो. विशेष म्हणजे स्त्रीची निवड नाकारण्याचा अधिकार पुरुषाकडे नसतो. कुठे सुरु आहे ही पंरपरा? काय आहे याचे महत्व? सविस्तर जाणून घेऊया.
झारखंडच्या काही आदिवासी भागात एक खास रीत आहे. एखादी स्त्री ज्या पुरुषाला पसंत करते, त्याच्या घरी जाऊन ती थेट सांगते की ‘हा माणूस माझा जोडीदार आहे’. मग तो पुरुष तिला ओळखत असो वा नसो, लग्न करणे त्याला बंधनकारक असते. नकार देण्याची मुभा त्याला नसते, कारण पूर्ण गाव आणि समाज तिच्या पाठीशी उभा राहतो.
नकार दिल्यास संपत्तीत समान वाटा
जर का पुरुष तरीही नकार देत असेल, तर पंचायत निर्णय देते आणि तो नेहमी स्त्रीच्या बाजूने असतो. अशा वेळी त्या स्त्रीला पुरुषाच्या मालमत्तेचा निम्मा (५०%) हिस्सा मिळतो. ही रीत अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे, ज्यामुळे महिलांना आर्थिक सुरक्षा मिळते.
घरात राहण्याचा पूर्ण अधिकार
नकाराच्या बाबतीतही स्त्रीला त्या घरातून हाकलता येत नाही. तिला स्वतंत्र खोली दिली जाते, जिथे ती सन्मानाने आणि आरामात राहू शकते. पुरुष वेगळ्या खोलीत राहतो, पण घर सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यामुळे महिलांचा आदर आणि स्वातंत्र्य जपले जाते.
महिलांना देवीसमजा दर्जा
या समाजात महिलांना देवी मानले जाते. त्यांच्या इच्छा आणि निर्णयांना दैवी महत्त्व दिले जाते. त्यामुळे त्यांच्या मनातील आवडीला खूप मूल्य असते आणि त्यांचा शब्द अंतिम मानला जातो.
परंपरेचे महत्त्व
रांचीचे व्यापारी बुधन सिंह पूर्ती यांनी ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. ते सांगतात की, ही शतकानुशतके चालत आलेली रीत आहे, जी फार कमी लोकांना माहिती आहे. यात महिलांना उच्च स्थान आणि पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते, जे इतर समाजांत दुर्मीळ आहे.





















