एसटीपी वि एसआयपी वि एसडब्ल्यूपी: SIP म्हणजे दर महिन्याला किंवा आठवड्याला ठरलेली छोटी रक्कम म्युचुअल फंडात गुंतवणे. याला पगारातून थोडे थोडे बचत करून श्रीमंत होण्याचा सोपा फॉर्म्युला म्हणतात. यात बाजार खाली-वर गेला तरी सरासरी 12% पर्यंत परतावा मिळण्याची शक्यता असते. छोट्या रकमेतून मोठा निधी तयार होतो. कारण येथे कंपाउंडिंगची जादू चालते. म्हणूनच आजकाल प्रत्येक गुंतवणूकदार SIP करतो. पण तुम्ही एसटीपी आणि एसडब्ल्यूपीबद्दल ऐकलंय का? जे तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरु शकतात. काय आहेत नेमक्या योजना? सविस्तर जाणून घेऊया.
STP चा जादूई फायदा काय?
समजा तुमच्याकडे अचानक 5 ते 10 लाख रुपये एकदम आले पण शेअर बाजारात एकदम टाकायला घाबरताय. मग STP हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही सर्व पैसे सुरक्षित डेट फंडात ठेवता आणि दर महिन्याला 20-50 हजार रुपये हळूहळू इक्विटी फंडात हलवता. यामुळे बाजार कोसळला तरी एकदम नुकसान होत नाही. हा ‘लमसम पैशाची SIP’ असते, ज्यामुळे जोखीम कमी आणि परतावा चांगला मिळतो.
SWP म्हणजे निवृत्तीनंतरचा पगार
SWP म्हणजे सिस्टेमॅटिक विड्रॉवल प्लान. तुम्ही म्युचुअल फंडात मोठी रक्कम गुंतवली असेल आणि आता दर महिन्याला 30-50 हजार रुपये नियमित हवे असतील तर SWP सुरू करा. फंडातून ठरलेली रक्कम आपोआप बँकेत येते. उरलेले पैसे फंडात गुंतलेले राहतात आणि त्यावर परतावा मिळत राहतो. निवृत्त झालेल्या मंडळींसाठी हा एकप्रकारे महिन्याला पगार मिळण्यासारखा पर्याय आहे.
तीनही पर्याय कधी वापरावेत?
नोकरी व्यवसाय करताय आणि भविष्यासाठी बचत हवी तर मग SIP करा. एकदम मोठी रक्कम आली आणि हळूहळू शेअर बाजारात टाकायची तर STP करा. निवृत्त झालात किंवा दर महिन्याला निश्चित उत्पन्न हवे असेल तर SWP करा.
खास गोष्ट कोणती?
STP आणि SWP हे दोन्ही पर्याय तुम्ही तुमच्याच म्युचुअल फंडात कधीही सुरू किंवा बंद करू शकता. यासाठी नवे फंड किंवा नवे खाते उघडण्याची गरज नाही.
महत्वाचा सल्ला
SIP, STP आणि SWP हे तिघेही एकाच कुटुंबातील भाऊ-बहीण आहेत. तुमच्या पैशाच्या गरजेनुसार कोणता भाऊ किंवा बहीण तुम्हाला जास्त मदत करेल हे ठरवा. पण लक्षात ठेवा – गुंतवणूक करताना तुमची जोखीम घेण्याची क्षमता आणि गरज लक्षात घेऊनच निर्णय घ्या!
(Disclaimer – हा लेख माहितीसाठी देण्यात आलाय. म्युच्यूअल फंड गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधिन असते. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
१. SIP, STP आणि SWP यात नेमका काय फरक आहे?
उत्तर: SIP: दर महिना/आठवड्याला ठरलेली छोटी रक्कम म्युचुअल फंडात टाकायची (बचत वाढवण्यासाठी). STP: एकदमुश्त मोठी रक्कम आधी डेट फंडात ठेवून हळूहळू इक्विटी फंडात हलवायची (जोखीम कमी करून गुंतवणूक करायची). SWP: आधी गुंतवलेल्या पैशातून दर महिना/तिमाही ठरलेली रक्कम काढायची (नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी).
२. माझ्याकडे अचानक १० लाख रुपये आले तर काय करावे – SIP की STP?
उत्तर: एकदम १० लाख शेअर बाजारात टाकणे धोक्याचे आहे. त्याऐवजी STP करा: सर्व पैसे सुरक्षित डेट फंडात ठेवा आणि दर महिन्याला ५०-७५ हजार रुपये इक्विटी फंडात हलवा. असे केल्याने बाजार कोसळला तरी एकदम नुकसान होणार नाही आणि चांगला सरासरी परतावा मिळेल.
३. निवृत्तीच्या वेळी दर महिन्याला ४०-५० हजार रुपये उत्पन्न हवे असेल तर काय करावे?
उत्तर: तुम्ही आधीच चांगला कॉर्पस (उदा. १-२ कोटी) म्युचुअल फंडात) तयार केला असेल तर SWP सुरू करा. दर महिन्याला ४०-५० हजार रुपये काढण्याची सोय करा. उरलेले पैसे फंडात गुंतलेले राहतील आणि त्यावर परतावा मिळत राहील. यामुळे तुम्हाला दुसरा ‘महिन्याचा पगार’ मिळेल आणि मूलभूत रक्कमही जास्त काळ टिकेल.





















