व्हायरल न्यूज: पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनच्या कालखंडामध्ये डोकावलं असता कैक घडामोडींचे संदर्भ मिळतात, कैक मोठे आघात, अपघात, नैसर्गिक आपत्तींचे संदर्भ दिसून येतात ज्यामुळं आजच्या घडीला असणारी जगाची रचना , देश, पर्वतरांगा, नद्या, समुद्र सारंकाही अस्तित्वात असल्याचं लक्षात येतं. आजवर विविध युगं आली आणि ती लुप्तही झाली. पण, गतकाळातील या युगांबाबत आजही संशोधक निरीक्षण करत असल्याचं आणि नवनवीन निष्कर्ष काढत असल्याचं पाहायला मिळालं आहे.
असंच एक अद्वितीय निरीक्षण आणि त्यातून थक्क करणारे निष्कर्ष समोर आले आहेत, जिथं समुद्रात लुप्त झालेल्या 8500 वर्षांपूर्वीच्या एका शहराचं अस्तित्वं पाहायला मिळत आहे. इतिहासाच्या पानांमध्ये लुप्त झालेल्या या शहराला ‘स्टोन एज अॅटलांटीस’ असं नाव असून, डेन्मार्कच्या Aarhus खाडीमध्ये भूगर्भशास्त्रज्ञांना हे इतिहासाची आणि गतयुगाची साक्ष देणारे पुरावे आढळले.
साधारण 8500 वर्षांपूर्वी जेव्हा अखेरच्या शीतयुगाचा शेवट झाला त्याचवेळी हे शहरदेखील पाण्याखाली गेल्याचं म्हटलं जातं. या अंतासमवेत बर्फाच्या मोठ्या चादरी वितळण्यास सुरुवात झाली, ज्यामुळं समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होऊन अश्मयुगीन शहरं पाण्याखाली गेली. सध्या करण्यात आलेल्या उत्खननात 430 चौरस फुटांच्याच भागात भूगर्भशास्त्रज्ञांना या भागात कधीकाळी मानवाचं अस्तित्वं होतं आणि ते नियमित दिनचर्येनुसार आयुष्य जगत होते असं सांगणारे अवशेष सापडले.
संशोधकांना पाण्याखाली काही दगडी हत्यारं, प्राण्यांची हाडं, लाकडाचा तुकडा या आणि अशा अनेक गोष्टी सापडल्या. Underwater archaeologist पीटर मोए अॅस्ट्रप यांच्या माहितीनुसार ही जागा ‘टाईम कॅप्सुल’ असून, तिथं सर्वकाही जणू ऑक्सिजन विरहित पर्यावरणात जतन झालं आहे, जणू तिथं वेळच थांबली आहे. पृथ्वीवरील समुद्राची पाणीपातळी अतिशय भीषण स्वरुपात वाली आणि तिनं किनारपट्टी क्षेत्र गिळंकृत केली ही भयावह बाब.
यापूर्वीच्या संशोधनाशी काय संबंध?
इथं समुद्रात अश्मयुगीन अवशेष सापडत असतानाच तिथं यापूर्वीच्या उत्खननातून संशोधकांना जमिनीखाली दडलेले असेच अवशेष सापडले होते. दरम्यान, समुद्रामध्ये गतयुगातील आणखी रहस्य दडली असून, समुद्राच्या पाण्यात ऑक्सिजनची कमतरता असल्या कारणानं या अवशेषांचं नैसर्गिकरित्या जतन झालं आहे. त्यामुळं या अवशेषांवरून आता अश्मयुगाची आणखी कोणती रहस्य बाहेर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
































