जागतिक बातमीः जागतिक स्तरावर सध्या अनेक भारतीयांचं लक्ष अतिशय भयंकर वृत्तानं वेधलं असून, या वृत्तानुसार जग कितीही पुढे आलं असलं तरीसुद्धा वर्णभेद मात्र अद्यापही मागे राहिलेला नाही, हीच शोकांतिका दुर्दैवानं समोर येत आहे. नुकताच आयर्लंड इथं मन सुन्न करणारा हा प्रकार घडला असून, परदेशात राहणाऱ्या भारतीयांसह इथं भारतातसुद्धा या घटनेचा सोशल मीडियाच्या माध्यतून तीव्र निषेध केला जात आहे.
आयर्लंडमध्ये घडलेली घटना काळजात धस्स करणारी
आयर्लंडमधील वॉटरफोर्ड इथं एका 6 वर्षीय भारतीय वंशाच्या मुलीला काही मुलांच्या घोळक्यानं अतिशय अमानुष मारहाण केल्याची भयंकर घटना घडली. मारहाण करताना ही मुलं, ‘भारतात परत जा…’ (Go Back to india) असं आवेषात ओरडत होती. यामध्ये चिमुकलीच्या गुप्तांगांना इजा पोहोचवल्याचा प्रकार या घटनेमध्ये घडला आणि हे वृत्त जागतिक स्तरावर लक्ष वेधून गेलं. आयर्लंडमध्ये आतापर्यंत भारतीय लहान मुलं वर्णभेदाचा शिकार होण्याची कोणतीही घटना समोर आली नव्हती, मात्र नुकत्याच घडलेल्या या अमानुष प्रकरणामुळं परदेशी वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.
कुठे आणि कधी घडली ही घटना?
4 ऑगस्ट रोजी ही मुलगी तिच्या काही मित्रमैत्रिणींसोबत घराबाहेर खेळत होती. तिच्या आईनं दिलेल्या माहितीनुसार लेकीवर हल्ला करणाऱ्यांमध्ये एक 8 वर्षांची मुलगी आणि 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश होता. सुरुवातीला मुलगी घराबाहेर खेळत असल्याचं पाहून तिची आई मुलाला खाऊ खालण्यासाठी घरात गेली. ‘मी तिला परत येते लगेचच असं सांगून बाळाला खाऊ घालण्यासाठी गेले’, असं मुलीच्या आईनं आयरिश मिररशी संवाद साधताना सांगितलं.
काही मिनिटांनीच ही मुलगी घरात आली आणि ती प्रचंड भेदरलेली दिसत होती. तिनं रडायलाच सुरुवात केली, तिला काहीही बोलता येत नव्हती, इतकी प्रचंड भीती तिच्या मनात घर करून गेली होती, असं या मुलीच्या आईनं सांगितलं. लेकीची ही अवस्था पाहून तिच्या आईला काहीच कळेना, तितक्यातच तिच्या एका मैत्रिणीनं तिथं असणाऱ्या एका मोठ्या मुलानं सायकलनं लेकीच्या गुप्तांगांवर मारलं, तर तिच्या चेहऱ्यावर बुक्केही मारल्याचं सांगितलं.
आयर्लंडमध्ये झालेल्या या घटनेमध्ये परदेशी मुलांच्या गटानं भारतीय वंशाच्या या चिमुकलीला शिवीगाळ करत, भारतीयांविषयी काही प्रक्षोभक वक्तव्य केल्याची माहिती या मुचीच्या आईनं दिली. आपल्याला केसानं ओढत माराहण केल्याचं मुलीनं तपासादरम्यान सांगितलं.
नागरिकत्वं असतानाही हेळसांड…
मुलीच्या आईनं जवळपास 8 वर्षे आयर्लंडमध्ये वास्तव्य केल्यानंतर नुकतंच त्यांना या देशाचं कायस्वरुपी नागरिकत्वं मिळालं होतं. मात्र आपल्या मुलीला आता घराबाहेर पाय ठेवायचीसुद्धा भीती वाटते असं सांगत आम्ही इथं, अगदी घरासमोरसुद्धा सुरक्षित नाही आहोत, अशा वेदनादायी शब्दांत मुलीच्या आईनं सद्यस्थितीचं कथन केलं. मुलीसोबत घडलेल्या या दुर्दैवी घटनेनं आईलासुद्धा हादरा बसला असून, लेकीला आपण सुरक्षित ठेवू शकलो नसल्याचं खंत त्यांच्या मनात घर करून आहे.
मुलीला ज्यांनी मारहाण केली त्यांना शिक्षा व्हावी अशी आपली मुळीच अपेक्षा नाही. मात्र त्या मुलांचं वर्णभेद आणि तत्सम मुद्यांवर समुपदेशन होणं गरजेचं असल्याची बाब मुलीच्या आईनं व्यक्त केली.
FAQ
ही घटना कधी आणि कुठे घडली?
ही घटना 4 ऑगस्ट 2025 रोजी वॉटरफोर्ड येथील मुलीच्या घराबाहेर, ती मित्रमैत्रिणींसोबत खेळत असताना घडली.
हल्लेखोर कोण होते?
हल्लेखोरांमध्ये एक 8 वर्षांची मुलगी आणि 12 ते 14 वर्षे वयोगटातील काही मुलांचा समावेश होता, ज्यांनी तिच्यावर हल्ला केला.
घटनेनंतर मुलीची अवस्था कशी होती?
मुलगी प्रचंड भेदरली होती, रडत होती आणि भीतीमुळे बोलू शकत नव्हती, ज्यामुळे तिच्या आईला धक्का बसला.

































