गूगल पे आणि फोनपे बुईसनेस मॉडेल: युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हे डिजिटल पेमेंट्सचे एक सोपे आणि पूर्णपणे मोफत माध्यम आहे. Google Pay आणि PhonePe यांनी UPI सारख्या मोफत सेवेचा उपयोग करून आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय मॉडेल्सद्वारे प्रचंड कमाई केली आहे. किराणा दुकानांमधील व्हॉइस स्पीकर, स्क्रॅच कार्ड्सद्वारे जाहिरात, आणि इतर डिजिटल सेवांमधून मिळणारा महसूल यांच्या जोरावर या कंपन्या यशस्वीपणे मोठा नफा कमावत आहेत. त्यांचे हे मॉडेल विश्वास, तंत्रज्ञान आणि ग्राहक-केंद्रित सेवांवर आधारित आहे, ज्यामुळे त्या डिजिटल पेमेंट क्षेत्रात अग्रेसर राहिल्या आहेत. Google Pay आणि PhonePe यांसारख्या कंपन्यांनी मागील वर्षी एकत्रितपणे 5,065 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. कोणतेही प्रत्यक्ष उत्पादन विक्री न करता या डिजिटल कंपन्यांनी हे यश कसे मिळवले? यामागील कारण आहे.
बिझनेस मॉडेलचा सविस्तर खुलासा
आयसी व्हेंचर कॅपिटलच्या संस्थापक भागीदार मृणाल झवेरी यांनी लिंक्डइनवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये या कंपन्यांच्या महसूल मॉडेलचा सविस्तर खुलासा केला आहे. त्यांच्या मते, या कंपन्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा लहान किराणा दुकानांमधून मिळतो. विशेषतः, PhonePe सारख्या ॲप्सनी किराणा दुकानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हॉइस-नियंत्रित स्पीकर सेवेच्या माध्यमातून कमाईचा एक स्थिर स्रोत तयार केला आहे.
कशी होते कमाई?
हे स्पीकर, जे “PhonePe वर 60 रुपये प्राप्त झाले” अशा घोषणा करतात, किराणा दुकानदारांना दरमहा 100 रुपये भाड्याने दिले जातात. ही सेवा सध्या 30 लाखांहून अधिक दुकानांमध्ये कार्यरत आहे, ज्यामुळे दरमहा 30 कोटी रुपये आणि वार्षिक 360 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. ही सुविधा केवळ ग्राहकांना UPI पेमेंट्सकडे आकर्षित करते. यासोबतच दुकानदारांना त्यांच्या व्यवहारांचा हिशेब ठेवण्यास आणि व्यवसाय वाढवण्यास मदत करते.
स्क्रॅच कार्ड्स आणि जाहीरात
या कंपन्यांच्या कमाईचे आणखी एक महत्त्वाचे स्रोत आहे स्क्रॅच कार्ड्स. ही कार्ड्स ग्राहकांना 12 रुपये कॅशबॅक किंवा कूपन्ससारख्या ऑफर्सद्वारे आकर्षित करतात. मात्र, हे केवळ ग्राहकांना प्रोत्साहन देण्यापुरते मर्यादित नाही, तर ब्रँड्ससाठी जाहिरातीचे एक प्रभावी साधन आहे. विविध ब्रँड्स त्यांच्या उत्पादनांचा प्रचार आणि दृश्यमानता वाढवण्यासाठी या स्क्रॅच कार्ड्सच्या जाहिरातीसाठी पैसे देतात. यामुळे गुगल पे आणि फोन पे यांना दुहेरी फायदा होतो. एकीकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स आणि दुसरीकडे ब्रँड्सकडून जाहिरात महसूल. हे मॉडेल एका यशस्वी गुंतवणूक यंत्राप्रमाणे कार्य करते. ज्यातून कंपन्यांना नफा मिळत राहतो.
अतिरिक्त महसूल स्रोत
या प्लॅटफॉर्म्सनी UPI च्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन इतर सेवांमधूनही कमाई वाढवली आहे. यामध्ये बिल पेमेंट्स, ऑनलाइन खरेदी, मर्चंट सर्व्हिसेस आणि डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेस यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, मर्चंट्ससाठी पेमेंट गेटवे सुविधा, क्रेडिट स्कोअर तपासणी, आणि विमा किंवा म्युच्युअल फंड खरेदी यांसारख्या सेवांमधून कमिशन मिळवले जाते. याशिवाय डेटा ॲनालिटिक्स आणि पर्सनलाइज्ड मार्केटिंग सेवांमधूनही या कंपन्या महसूल मिळवतात.






























