निमिशा प्रिया प्रकरण: मुळची केरळमधील पलक्कड येथील नर्स असलेल्या निमिषा प्रियाला 16 जुलै रोजी येमेनमध्ये फाशी दिलं जाणार आहे. मानवाधिकार कार्यकर्ते सॅम्युअल जेरोम यांनी दिलेल्या माहितीनुसार, निमिषा प्रियावर येमेनमधल्या एका नागरिकाची हत्या केल्याचा आरोप असून या प्रकरणी सध्या ती तुरुंगात आहे. जेरोम यांच्याकडे निमिषा प्रियाची आई प्रेमा कुमारी यांची पॉवर ऑफ अटॉर्नी असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निमिषा प्रियाला १६ जुलै रोजी फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुरुंग प्रशासनाने या आदेशावर सही केली आहे. त्यामुळे निमिषा प्रियाला फाशी होणार हे निश्चित मानलं जातं असतानाच आता ज्या व्यक्तीच्या हत्येचा आरोप तिच्यावर आहे त्याच्या कुटुंबाला फाशीच्या तीन दिवस आधी निमिषा प्रियाच्या कुटुंबियांना एक ऑफर दिली असून त्यामुळे निमिषाचे प्राण वाचू शकतात. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि आता निमिषा वाचण्याचा एकमेव मार्ग काय आहे ते पाहूयात…
निमिषाने नेमका काय गुन्हा केलाय?
निमिषा प्रियाने भारतात नर्सिंगचा कोर्स पूर्ण केल्यानंतर 2011 मध्ये येमेन गाठलं. ती तिथेच स्थायिक झाली. आपल्या आई वडिलांना चांगलं आयुष्य जगता यावं या उद्देशाने तिने येमेनला जाण्याचा पर्याय निवडला होता. आखाती देशात चांगला पैसा मिळतो या विचाराने ती तिथे कामाच्या शोधात पोहोचली. तिचे आई आणि वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर असल्याने घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. सुरुवातीला निमिषाने येमेनमधल्या अनेक रुग्णालयांमध्ये नर्स म्हणून काम केलं. त्यानंतर तिने तिचं क्लिनिक सुरु करण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये तिचा संपर्क तलाल अब्दो महदी नावाच्या स्थानिक व्यक्तीशी झाला. तलाल अब्दोने निमिषासोबत येमेनमध्ये क्लिनिक सुरु करण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं. निमिषाला क्लिनिक सुरु करण्यासाठी काही अटी शर्थी ठेवण्यात आल्या. निमिषाने महदीशी भागिदारी केली आणि क्लिनिक सुरु केलं होतं. देशा बाहेरुन आलेल्या व्यक्तीला येमेनमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरु करता येत नाही. त्यासाठी त्याला तिथल्या स्थानिक माणसाशी भागिदारी करावी लागते.
क्लिनिक सुरु केल्यानंतर निमिषा आणि तलाल अब्दो महदी या दोघांचे मतभेद झाले. त्यावेळी निमिषाने महदीने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला. तसंच त्याने माझा पासपोर्ट स्वतःकडे ठेवला आहे असाही आरोप निमिषाने केला होता. निमिषाने महदीविरोधात पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर महदीला 2016 साली पोलिसांनी अटक केली. मात्र त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं. 2017 मध्ये या वादाला वेगळं वळण लागलं. भारतात परतण्यासाठी निमिषाला तिचा पासपोर्ट हवा होता. तिने महदीला सेडेटिव्ट इंजेक्शन दिलं होतं. मात्र त्याच्या ओव्हरडोसमुळे महदीचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणात निमिषाला अटक करण्यात आली आणि प्रकरण फाशीपर्यंत पोहोचलं.
निमिषाच्या कुटुंबाने काय ऑफर दिली?
निमिषा प्रियाला तीन दिवसांमध्येच तिला फासावर लटकवलं जाणार अशी बातमी जगभरात चर्चेत असतानाच आता तिच्या कुटुंबियांनी मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना ‘ब्लड मनी’ची ऑफर दिली आहे. निमिषा प्रियाच्या कुटुंबाने ‘ब्लड मनी’ म्हणून तब्बल 10 लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 8 कोटी 60 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे.
वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे…
येमेनमधील सुप्रीम ज्यूडिशिअल काऊन्सिलने 2023 मध्ये निमिषा प्रियाला मृत्यूदंड देण्याची शिक्षा कायम ठेवली. येमेनच्या राष्ट्रपतींनीही निमिषा प्रियाला फासावर लटवण्यासाठी परवानगी दिली आहे. आता निमिषाला वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मयत व्यक्तीच्या कुटुंबाने निमिषाला माफ करणं हा आहे. मयत व्यक्तीच्या कुटुंबाने निमिषाला माफ केलं तरी निमिषाच्या कुटुंबाला मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना ‘ब्लड मनी’ म्हणून रक्कम द्यावी लागणार आहे.
‘ब्लड मनी’ काय प्रकार आहे?
येमेनमध्ये शरीयत कायदा आहे. शरीयत कायद्यानुसार, पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांनी आरोपीला माफ केलं तर आरोपीची मुक्तता केली जाते. अशा प्रकरणांमध्ये आरोपीला फाशी दिली जात नाही. मात्र यासाठी आरोपीच्या कुटुंबियांना ‘ब्लड मनी’ म्हणून रक्कम द्यावी लागते. एकाप्रकारे ही गुन्हा केल्याची आणि जवळच्या व्यक्तीचा जीव घेतल्याची नुकसानभरपाईच असते. निमिषाच्या कुटुंबाने आणि तिला सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेच्या विरोधात असलेल्यांनी जवळपास 1 मिलियन डॉलर्स म्हणजेच 8 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम मयत व्यक्तीच्या कुटुंबियांना देण्याची तयारी दर्शवली आहे. 2020 पासून ‘सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल अॅक्शन काऊन्सिल’ नावाची संस्था तिची मदत करण्यासाठी कार्यरत आहे. त्यांनीच हा पैसा उभा केला आहे.
कोणकोणत्या देशात आहे असा कायदा?
‘ब्लड मनी’ची पद्धत अनेक अरब देशांमध्ये आहे. यामध्ये सौदी अरेबिया, इराण, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई, येमेन, कतार, बहरीन, कुवैतसारख्या देशांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी ही रक्कम किती असते हे निश्चित करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या देशांसाठी ही रक्कम वेगवेगळी आहे. सौदी अरेबियामध्ये मुस्लिम पुरुषाची हत्या केल्यास ब्लड मनी म्हणून 2 लाख रियाल देण्याची तरतूद आहे.
































