स्टॉक मार्केट न्यूज: शेअर बाजार. अनेकांचेच पैसे, आयुष्यभराची पुंजी या गुंतवणुकीच्या एका चक्रामध्ये गुंतलेली असते. यातूनन प्रत्येक वेळी चांगला परतावा मिळेलच असं नाही, पण जेव्हा परतावा मिळण्याची संधी येते तेव्हा मात्र एक घसघशीत रक्कम हाती आली की या क्षेत्रात पैसे गुंतवण्याचा निर्णय योग्य होता असंच अनेकांना वाटतं.
शेअर बाजारात शक्यतांचा आणि तर्काचाच खेळ आहे असं जाणकार म्हणतात आणि अनेकदा हे खरं आहे याची प्रचितीसुद्धा येते. अशाच एका मल्टीबॅगर शेअरनं सध्या गुंतवणुकदारांचं लक्ष वेधत त्यांना हैराण करून सोडलं आहे. हा एक असा शेअर आहे, ज्याची किंमत एकेकाळी 4.20 रुपये इतकी होती आणि आता त्याच शेअरनं आता गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा परतावा दिला आहे. शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळं हे शक्य झालं असून या शेअरमधून गुंतवणूकदारांना 64000 टक्के परतावा मिळाला आहे.
सोपं गणित, 1 लाखाचे झाले 6 कोटी रुपये…
शेअरबाजारातील गुंतवणूकदारांना मालामाल करणार हा शेअर आहे ‘आयआयआर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’. 9 जुलै 2025 रोजी या शेअरमध्ये 1.33 टक्क्यांची घट होऊन त्याची किंमत 2694 रुपयांवर पोहोचली होती. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा या शेअरमध्ये घसरण झाली असली तरीही दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीनं त्यानं चांगला परतावा दिला आहे.
सेमीकंडक्टर डिवाईस आणि सेमीकंडक्टर मॉड्यूल तयार करणाऱ्या या कंपनीचा शेअर वर्षभरात 10 टक्क्यांनी घरंगळला मात्र मागील 5 वर्षांमध्ये 8800 टक्के आणि एका वर्षात 40 टक्के परतावाही याच शेअरनं दिला आहे. थोडक्यात पाच वर्षांपूर्वी या शेअरमध्ये कोणी एक लाखांची गुंतवणूक केली त्याची किंमत आज 88 लाखांहून जास्त झाली असती.
19 वर्षांपूर्वी काय होती किंमत?
19 वर्षांपूर्वी या कंपनीची स्टॉक व्हॅल्यू 4.20 रुपये इतकी होती आणि आता तोच शेअर 2694 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळं एकंदर अंदाज घेतल्यास या शेअरनं गुंतवणूकदारांना 64000 हूनही अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच 19 वर्षांपूर्वी कोणी त्यात 1 लाख रुपये गुंतवले असतील तर, आज त्याच शेअरनं गुंतवणूकदाराला 6 कोटींचा परतावा दिला असता. आहे की नाही हे थक्क करणारं गणित?
(शेअर बाजारात गुंतवणूक जोखमीची असून कोणत्याही वृत्ताची खातरजमा झी 24 तास करत नाही. गुंतवणूकविषयक निर्णयांसाठी आर्थिक सल्लागार आणि जाणकारांची मदत घ्या.)























