जागतिक बातमीः जगभरात जेव्हाजेव्हा श्रीमंतीचा उल्लेख होतो तेव्हातेव्हा जागतिक स्तरावरील धनाढ्य व्यक्तींच्या नावांमध्ये एलॉन मस्क, जेफ बेजोस, मार्क झुकरबर्ग यांची नावं कायमच येतात. पण, या साऱ्यांमध्ये एक व्यक्ती अशीही आहे, जी प्रसिद्धीझोतता नसली तरीही त्या व्यक्तीचं महत्त्वं मात्र नाकारता येत नाही.
वॉल स्ट्रीटची खरी ताकद ज्या व्यक्तीच्या हातात आहे, ती व्यक्ती अब्जाधीश नाही, त्यांचं नावही चर्चेच्या वर्तुळांमध्ये नसतं. मात्र तरीही त्यांना किमयागार म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. या व्यक्तीचं नाव आहे लॅरी फिंक. जगातील सर्वात मोठ्या असेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकरॉकचे ते चेअरमन आणि सीईओ आहेत. ही कंपनी 7.4 ट्रिलियन डॉलर (जवळपास ₹616 लाख कोटी) रुपयांची उलाढाल करते. हा आकडा अमेरिकेच्या एकूण दरडोई उत्पन्नापैकी (GDP) अर्धा असून, याच कारणानं फिंक यांना अर्ध्या अमेरिकेचे मालक असंही म्हटलं जातं.
जगातील सर्व कंपन्यांमध्ये ब्लॅकरॉकची गुंतवणूक असून, यामध्ये अॅपल, गुगल, अॅमेझॉनसह भारतातील प्रसिद्ध कंपन्यांचाही समावेश आहे. पण, इतकं सारं असतानाही फिंक अब्जाधीश का नाहीत हासुद्धा प्रश्नच.
फिंक अब्जाधीश का नाहीत?
ब्लॅकरॉककडून जो पैसा हाताळला जातो तो सामान्य नागरिक, निवृत्तीवेतन, विमा कंपन्या आणि सरकारी संस्थांचा पैसा असतो. लॅरी फिंक हा पैसा नेमका कुठे आणि कसा गुंतवला जाईल याचा निर्णय घेतात. मात्र ही संपूर्ण रक्कम त्यांच्या खासगी संपत्तीचा भाग नाही. त्यामुळं त्यांच्या निर्णयांनी अमेरिकेच्या शेअर बाजारात उलथापालथ होत असली तरीही अब्जाधीशांच्या यादीत मात्र त्यांच्या नावाचा समावेश नाही.
हेसुद्धा वाचा : 99% कारचालकांना या Traffic नियमाची कल्पनाच नाही, म्हणूनच लहानशा चुकीमुळं बसतो चलानाचा फटका
फोर्ब्सच्या माहितीनुसार एप्रिल 2022 पर्यंत लॅरी फिंक यांची एकूण संपत्ती जवळपास 1 बिलियन डॉलर इतकी होती. हा आकडा त्यांच्याद्वारे घेतले जाणारे निर्णय, वेतन, बोनस आणि ब्लॅकरॉकमधील त्यांची भागिदारी यावर आधारिक आहे. ब्लॉकरॉक हे इतकं मोठं नाव आहे की, जागतिक स्तरावरील आर्थिक धोरणांवरही त्यांच्या निर्णयांचा अप्रत्यक्ष परिणाम होताना दिसतो. ज्यामुळं अमेरिकेपासून ते अगदी युरोपीय आणि आशियाई राष्ट्रसुद्धा ब्लॅकरॉकच्या निर्णयांवर लक्ष ठेवून असतात.































