सीटल्स च्युइंग गमची भिंत: च्युइंगम खाल्ल्यावर बहुतेक सगळे लोक त्याला थुंकून देतात. पण फक्त एक विचार करा की अशी एखादी जागा आहे जिथे लोक च्युइंग गम खाल्ल्यानंतर ती भिंतीवर चिकटवतात आणि इतकंच नाही, तर काही लोक तर त्या भिंतीकडे बघून परत ते च्युइंगम चाटतात, किंवा तेच च्युइंगम पुन्हा खातात. आता हे ऐकून तुमचं डोकं नक्कीच चक्रावलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की असं कधी असतं का कुठे? पण हे खरंच आहे आणि असं एक ठिकाण देखील आहे.
कुठे आहे हे ठिकाण?
ही जागा अमेरिकेच्या सिएटल शहरात असून त्या ठिकाणाचं नाव गम वॉल आहे. पाइक प्लेस मार्केटजवळ असलेल्या एका गल्लीत ही भिंत आहे. तर आज ती भिंत सिएटलमधल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक ठरली आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे तरुण लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जातात.
सुरुवात कशी झाली?
1990 च्या दशकात मार्केट थिएटरमध्ये तिकीट घेण्यासाठी लोक रांगेत उभे होते. त्या वेळी काही जणांनी च्युइंगम चावून भिंतीवर चिटकवायला सुरुवात केली. सुरुवातीला मस्करी म्हणून सुरू झालेला हा प्रकार हळूहळू एक परंपरा झाली. काहींना वाटायचं की ते च्युइंगम तिथून काढून टाकावं, पण लोकांनी ते परत लावले.
गम वॉल म्हणजे आता नुसती च्युइंगमची भिंत राहिलेली नाही. लोक च्युइंगम वापरून त्यावर नावं लिहितात, हार्ट शेप काढतात, छोट्या मूर्ती बनवतात. ती जागा एक प्रकारची सार्वजनिक ‘आर्ट प्रोजेक्ट’च बनला आहे. कधी-कधी या भिंतीची साफसफाई केली जाते, कारण च्युइंगममुळे जुन्या भिंतींवर परिणाम होतो. पण अनेकांचं म्हणणं आहे की, च्युइंगम काढलं तर त्या जागेशी जोडलेल्या सगळ्या आठवणीही नष्ट होतील.
आज च्युइंगम वॉल पाहण्यासाठी फक्त सिएटलचे लोक नाही, तर जगभरातून पर्यटक ही विचित्र, पण भन्नाट जागा पाहायला येतात. मीडिया रिपोर्ट्सनं या ठिकाणाला ‘सर्वात घाणेरडं पर्यटनस्थळ’ असं म्हटलं असलं, तरीही इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ती एक वेगळी आणि आठवणीत राहणारी जागा आहे.
कुठे आहे ही गम वॉल?
ही भिंत सिएटल शहराच्या डाऊनटाउन भागात, पाइक प्लेस मार्केटच्या खाली असलेल्या पोस्ट अॅली नावाच्या गल्लीत आहे. मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ती फार लांब नाही. भिंतीवर काही ठिकाणी च्युइंगमचा थर इतका जाड आहे की ते काही इंचांपर्यंत आहे. सुमारे 15 फूट उंच आणि 50 फूट लांब अशी ही च्युइंगमनं झाकलेली भिंत आहे.































