ख्रिस केर्न्स: क्रिकेटमुळे प्रसिद्धीसोबत ग्लॅमर, संपत्तीदेखील मिळते. यामुळे क्रिकेटर्स श्रीमंत झालेले आपण पाहिले असेल. सामन्यात एक चांगली इनिंग किंवा चांगली गोलंदाजी केल्यास क्रिकेटर रातोरात स्टार बनून जातो. तुम्ही अशा अनेक क्रिकेटपटूंची कहाणी ऐकली असेल जे क्रिकेट खेळून एकाच वेळी श्रीमंत झाले. पण आज आपण अशा क्रिकेटपटूची कहाणी घेऊन घेऊया, ज्याचे नाव घातक अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणले जाते. हा अष्टपैलू खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा राजा होता पण नियती त्याच्याशी वेगळा खेळ खेळली. निवृत्तीनंतर या दिग्गजावर रस्त्यावर येण्याची वेळ आली. उदरनिर्वाहासाठी त्याला ट्रक चालवण्यापासून ते बस शेल्टर साफ करण्यापर्यंत सर्व काही करावे लागले.हे तेच नाव आहे ज्याने 2000 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न मोडले.
चांगली कामगिरी
आपण न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्सबद्दल बोलतोय. जो त्याच्या खेळण्याच्या काळात न्यूझीलंड क्रिकेटचा ‘पोस्टर बॉय’ होता. या शक्तिशाली वेगवान गोलंदाज आणि बिग हिटरने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधील सर्वात धोकादायक क्रिकेटपटूंमध्ये आपले नाव नोंदवले. त्याच्या 17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, केर्न्सने एकूण 62 कसोटी, 215 एकदिवसीय आणि 2 टी-20 सामने खेळले. केर्न्सने त्याच्या जबरदस्त फलंदाजीने 8273 धावा केल्या आणि 420 विकेट्सही घेतल्या. त्याने 81 झेलही घेतले. 2000 मध्ये विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयरच्या 5 खेळाडूंपैकी एक म्हणून केर्न्सची निवड झाली. केर्न्सने फलंदाजीने खूप चांगली कामगिरी केली आणि कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 240 षटकारही मारले.
व्यवसायात नुकसान
2000 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये भारताविरुद्ध मॅचविनिंग शतक ठोकून आणि त्याच्या संघासाठी जेतेपद जिंकून अनेक भारतीय चाहत्यांचे मन मोडणारे नाव ख्रिस केर्न्स होते. क्रिसने टीम इंडियाच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या होत्या. या सामन्यात एकेकाळी भारताची पकड कमकुवत होती. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 150 धावांच्या आत 5 विकेट गमावल्या. पण क्रिस केर्न्स वेगळ्याच मूडमध्ये फलंदाजीसाठी आला. त्याने 113 चेंडूत 102 धावांची नाबाद खेळी केली आणि आपल्या संघाला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. केर्न्सच्या बळावर न्यूझीलंडने भारताने दिलेले 265 धावांचे लक्ष्य दोन चेंडू शिल्लक असताना 4 विकेट घेऊन साध्य केले. न्यूझीलंडच्या या दिग्गजाने 2004 मध्ये कसोटी क्रिकेटला रामराम केला. दोन वर्षांनंतर 2006 मध्ये त्याने एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर त्याचा वाईट काळ सुरु झाला. निवृत्तीनंतर त्याने काही वर्षे हिऱ्यांचा व्यवसाय केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही आणि त्याला नुकसान सहन करावे लागले. तो इंडियन क्रिकेट लीगचाही भाग बनला. पण मॅच फिक्सिंगमुळे त्याला कोर्टात जावे लागले.
ललित मोदींकडून मॅच फिक्सिंगचे आरोप
न्यूझीलंडचा आणखी एक अष्टपैलू खेळाडू लान्स केर्न्सचा मुलगा क्रिस केर्न्स याची माजी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आयुक्त ललित मोदी यांनी लावलेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपांसाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चौकशी केली. मार्च 2012 मध्ये केर्न्सने ललित मोदी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. न्यूझीलंडचा खेळाडू 2008 मध्ये मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी होता, असे आरोप मोदींनी ट्विटरवरुन केला होता. यानंतर केर्न्सला खर्च आणि नुकसान भरपाई मिळाली. नंतर मेट्रोपॉलिटन पोलिसांनी केर्न्सविरुद्ध खोटी साक्ष देणे आणि न्यायाचा मार्गात अडथळा आणण्याचा ठपका ठेवला. थोडक्यात ललित मोदी यांनी केर्न्सविरुद्ध केलेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे त्याला क्रिकेटशी संबंधित सर्व काम गमवावे लागले.
कठोर परिश्रम करतोय
केर्न्सने आयुष्यात असे कठीण क्षण अनुभवले की इतकी प्रसिद्धी असलेला एक दिग्गज क्रिकेटपटू कधीही कल्पना करू शकत नाही. तो स्वतःचे आणि त्याच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी ट्रक चालवत असे. तो बस शेल्टर देखील साफ करत असे. मिड-डेच्या वृत्तानुसार, माजी क्रिकेटपटू ऑकलंड कौन्सिलमध्ये काम करत असे. जिथे तो न्यूझीलंडच्या राजधानीत ट्रक चालवायचा. ‘केर्न्स खूप मेहनत घेतोय आणि शक्य तितके त्याच्या कुटुंबाचा संभाळ करतोय. तो निराश नाहीय, तो धैर्य दाखवतोय आणि बस शेल्टर साफ करून कठोर परिश्रम करतोय’, असा खुलासा न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि केर्न्सचा जवळचा मित्र डायन नॅशने केला होता.
आतड्यांचा कर्करोगाचे निदान
ऑगस्ट 2021 मध्ये ख्रिस केर्न्सला हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्याला लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले. चार ओपन-हार्ट सर्जरींपैकी एका दरम्यान स्ट्रोक आल्यानंतर तो कंबरेपासून अर्धांगवायू झाला. पुढच्याच वर्षी तो कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराला बळी पडला. फेब्रुवारी 2022 मध्ये त्याला आतड्यांचा कर्करोग झाल्याचे निदान झाले.
ऑस्ट्रेलियात स्थायिक
13 जून 1970 रोजी पिक्टन (मार्लबरो) येथे जन्मलेला 54 वर्षीय क्रिकेटपटू आता ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथे आपले जीवन जगतोय. आरोग्याच्या लढाईत माझ्यासाठी आशेचा किरण देखील होता. माझ्या आत खूप राग आणि निराशा होती पण मी ते शांतपणे सहन केले. मी ऑस्ट्रेलियात येऊन स्थायिक झालो आणि माझे आयुष्य जगू लागल्याचे त्याने एका पॉडकास्टमध्ये म्हटले.





























