ब्रिटिश इतिहासकारांच्या सुरुवातीच्या प्रभावामुळे भारतीय इतिहासात अनेक चुका नोंदवल्या गेल्या आहेत असा दावा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे (Rajasthan Governor Haribhau Bagade) यांनी केला आहे. यामध्ये ज्यामध्ये जोधाबाई आणि मुघल सम्राट अकबर यांच्या लग्नाचाही समावेश असल्याचं ते म्हणाले आहेत. उदयपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना हरिभाऊ बागडे यांनी अकबरनामामध्ये (Akbarnama) जोधा-अकबर यांच्या लग्नाचा (Jodha and Akbar marriage) उल्लेख नाही असा दावा केला.
“जोधा आणि अकबर यांचं लग्न झालं होतं असं म्हटलं जातं. त्यावर चित्रपटही तयार करण्यात आला आहे. इतिहासाची पुस्तकंही हीच गोष्ट सांगतात. पण हे सर्व खोटं आहे,” असं विधान हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे.
“भारमल नावाचा एक राजा होता आणि त्याने एका दासीच्या मुलीचे लग्न अकबराशी लावून दिले,” असा दावा बागडे पुढे करतात. राज्यपालांच्या या विधानामुळे 1569 मध्ये आमेर शासक भारमलची मुलगी आणि अकबर यांच्यात लग्न झाल्याचा वाद पुन्हा वरती आली आहे.
सवाई जयसिंग दुसरे यांनी 1727 मध्ये जयपूरला राजधानी हलवण्यापूर्वी आमेर किंवा अंबर हे सध्याच्या जयपूरजवळील एक राजपूत राज्य होते आणि कचवाहा राजपूतांनी राज्य केले होते.
“इंग्रजांनी आपल्या वीरांचा इतिहास बदलला. त्यांनी तो योग्यरित्या लिहिला नाही आणि सुरुवातीला इतिहासात जे लिहिलं गेलं त्याला मान्यता देण्यात आली. नंतर काही भारतीयांनी इतिहास लिहिला, पण तो अजूनही ब्रिटिशांच्या प्रभावाखाली होता,” असं राज्यपाल बागडे म्हणाले. राजपूत शासक महाराणा प्रताप यांनी अकबराला तह पत्र लिहिले या ऐतिहासिक दाव्यालाही त्यांनी आव्हान दिले आणि ते पूर्णपणे दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं.
“महाराणा प्रताप यांनी कधीही त्यांच्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. इतिहासात अकबराबद्दल जास्त आणि महाराणा प्रतापांबद्दल कमी शिकवले जाते,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आता परिस्थिती सुधारत आहे असंही त्यांनी मान्य केलं. “नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात, आपली संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपून भविष्यातील आव्हानांसाठी नवीन पिढीला तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत,” असं ते म्हणाले.
राज्यपाल बागडे यांनी महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे देशभक्तीचे प्रतीक म्हणून कौतुक केलं. “त्यांच्या जन्मात 90 वर्षांचे अंतर आहे. जर ते समकालीन असते तर देशाचा इतिहास वेगळा असता. दोघांकडे शौर्य आणि देशभक्तीच्या समान दृष्टिकोनाने पाहिले जाते,” असं ते म्हणाले. महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे त्यांच्या सन्मानार्थ महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा स्थापित करण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं.






























