मुळशी (पौड) : पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने बालेवाडी येथे पार पडलेल्या पुणे कबड्डी लीगसाठीच्या निवड चाचणीत मुळशी तालुक्यातील कोंढावळे गावचा अभिमान असलेली आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू कु. सानिया पप्पू कंधारे हिची उल्लेखनीय कामगिरीमुळे निवड करण्यात आली.
श्री बालाजी प्रतिष्ठान कबड्डी संघ, कोथरूड या संघातून चाचणीत भाग घेतलेल्या सानियाने आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन करत सलग तिसऱ्यांदा या प्रतिष्ठित लीगमध्ये स्थान मिळवले आहे. यंदाच्या हंगामात ती झुंजार खेड या संघाकडून मैदानात उतरणार आहे.
सानियाच्या निवडीमुळे संपूर्ण मुळशी तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, क्रीडाप्रेमींनी तिचे भरभरून अभिनंदन केले आहे. कोच व मार्गदर्शकांच्या परिश्रमासह स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावरच तिने हे यश संपादन केल्याचे बोलले जात आहे.
सानिया कंधारे हिने आजवर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळताना अनेक वेळा आपली छाप पाडली आहे. तीने कठोर सराव, निष्ठा आणि चिकाटीच्या जोरावर यशाची घौडदौड कायम राखली आहे.
या निवडीमुळे मुळशी तालुक्यातील महिला खेळाडूंसाठी प्रेरणादायी आदर्श उभा राहिला असून, कोंढावळे गावासाठी ही अभिमानाची बाब आहे.


































