मुळशी (मुठा): मुठा खोऱ्यातील मुठा ते लवासा रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. रोडवर पाणी साचल्याने जागोजागी डबकी तयार झाली असून, ठिकठिकाणी खड्ड्यांनी रस्त्याचे नक्षत्रच उडवले आहे. परिणामी, वाहनचालक— विशेषतः दुचाकीस्वार—प्रवासा दरम्यान जीव मुठीत घेऊन चालत आहेत. पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे.
या रस्त्यावर चार कोटी रुपयांचा खर्च करून डांबरीकरणाचे काम झाले होते, मात्र प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था बघता तो खर्च वाया गेल्याचे चित्र आहे. बांधकाम विभागाने पाणी निचऱ्याची कोणतीही व्यवस्था केली नसल्याने, पावसाचे पाणी सरळ रस्त्यावर साचत असून, त्यातूनच डबकी आणि खड्ड्यांचा त्रास वाढला आहे.
या विरोधात युवासेनेच्या वतीने रस्त्यावर खड्ड्यात झाड लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी (शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेचे उपजिल्हा अधिकारी अमित कुंडले, विभाग अधिकारी आकाश भरेकर आणि ग्रामपंचायत सदस्य खंडू उभे यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या भागात वर्षभर मोठ्या प्रमाणावर पर्यटक ये-जा करत असतात, मात्र इतक्या महत्त्वाच्या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी आणि रस्त्यांची डागडुजी, तसेच पाण्याच्या निचऱ्याची प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


































