पुणे : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे झालेल्या दुर्घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत बोलताना श्री. डुडी यांनी नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) संदीप गिल्ल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डुडी यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील जुने आणि धोकादायक पूल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलक, रेल्वे पूल यांची ७ दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करावा. तपासणीत धोकादायक ठरलेली स्थळे तातडीने काढून टाकावीत. कार्यवाही करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी.”
पावसाळ्यात धोकादायक रस्ते आणि पर्यटनस्थळी बॅरिकेड्स लावावेत, दिशादर्शक फलक उभारावेत, आणि वन व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने अतिरिक्त कर्मचारी तैनात करावेत. तसेच संभाव्य धोकादायक ठिकाणी मॉकड्रील आयोजित करून प्रशासन सज्ज ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.
डुडी यांनी यावेळी दिलेले महत्त्वाचे निर्देश:
- दरडप्रवण गावांत नागरिकांना पूर्वसूचना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती द्यावी.
- पूररेषेखालील अतिक्रमणे हटवून सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात.
- आरोग्य विभागाने औषधे, खाटा, रक्तपेढी, रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात.
- महावितरणने वीज खांब, रोहित्र, तारा यांची तपासणी करावी.
- अपघातप्रवण भागांमध्ये वाहतूक व्यवस्थापन आणि जीवरक्षकांची नियुक्ती करावी.
- आपदा मित्रांच्या कार्यशाळा घेऊन चांगले कार्य करणाऱ्यांना सन्मानित करावे.
पालखी सोहळा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डुडी यांनी मार्गांवरील अतिक्रमणे आणि धोकादायक वृक्ष हटवून रस्त्यांची दुरुस्ती आणि सुरक्षिततेची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी स्ट्रक्चरल ऑडिटसाठी तज्ज्ञ पॅनेल स्थापन करण्याची सूचना दिली. तसेच जिल्ह्यातील अपघात प्रवण ठिकाणी विशेष उपाययोजना राबवण्याचा आग्रह धरला.
पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांनी जिल्ह्यातील धोकादायक स्थळांची पाहणी सुरू असून, दर १५ दिवसांनी स्थानिक प्रशासनासोबत समन्वय बैठक घेण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, कृषी, आरोग्य, महानगरपालिका, महावितरण, वनविभाग, हवामान विभाग आदी विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.






























