पुणे, (दि.२५) : “भारत माता की जय”, “वंदे मातरम” अशा घोषणांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमला, कारण देशात २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या घटनेला आज ५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर आयोजित विशेष माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते झाले.
या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, तहसीलदार श्वेता पवार, माहिती अधिकारी सचिन गाढवे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसलेल्या ज्येष्ठ व्यक्तींना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्या सर्वांनी दिलेल्या घोषणांनी परिसर भारावून गेला.

प्रदर्शनात भारताच्या प्राचीन काळापासून सुरू झालेली लोकशाहीची वाटचाल, स्वतंत्र्योत्तर भारतातील संसदीय प्रणालीचा विकास, आणीबाणीपूर्व आणि आणीबाणी कालखंडातील महत्त्वाच्या घडामोडी यांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे संयोजन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘ए’ विंगमध्ये तळमजल्यावर २५ जुलै २०२५ पर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले राहणार असून अधिकाधिक नागरिकांनी या ऐतिहासिक घटनांची माहिती घेण्यासाठी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.






























