पुणे (बालेवाडी) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लहू बालवडकर सोशल वेल्फेअर संस्थेच्या वतीने वारकऱ्यांच्या सेवेसाठी तिसऱ्यांदा मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते या विशेष अॅम्ब्युलन्स सेवेचे उद्घाटन झाले.
ही सेवा संस्थापक लहू बालवडकर यांच्या आजी कै. श्रीमती भिकाबाई शंकर बालवडकर यांच्या वारीतील भक्तिभावाची प्रेरणा घेत राबवली जात आहे. गेल्या २५ वर्षांपासून त्या पायी वारी करत होत्या. त्यांच्याच संकल्पनेतून, गेली तीन वर्षे संस्थेकडून वारी मार्गावर रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. यंदाही ही सेवा अधिक जोमाने देण्यात येणार आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. बालवडकर सोशल वेल्फेअर संस्थेने सुरू केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तो फारच उपयुक्त ठरणार आहे.”

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, “आषाढी वारी ही आपल्या सांस्कृतिक अस्मितेचा भाग आहे. या वारीत लाखो भाविक सहभागी होतात. त्यांना वेळेवर आरोग्यसेवा देणं महत्त्वाचं आहे आणि लहू बालवडकर यांचे हे कार्य निश्चितच गौरवास्पद आहे.”
या उपक्रमांतर्गत संपूर्ण वारी मार्गावर मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचारांची सोय करण्यात आली आहे. वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लहू गजानन बालवडकर (अध्यक्ष, कोथरूड विधानसभा – उत्तर मंडळ) यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, सचिन पाषाणकर, मोरेश्वर बालवडकर, सुभाष भोळ, मनोज दळवी, श्रेयश जाधवर, अभय बागल, वैदहीताई बापट, स्मृतीताई जैन, उज्वलाताई साबळे, मीनाताई पारगावकर आदींसह लहू बालवडकर मित्रपरिवार उपस्थित होता.

































