पुणे (दि.17) : जागतिक योग दिनानिमित्त २१ जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ७.३० वाजता होणार आहे. वारकऱ्यांसाठी ओळखपत्र, टी-शर्ट, पाणी, स्वच्छतागृहे, बसण्याची व्यवस्था यांसह शाळांमध्येही योगासाठी आवश्यक सुविधा पुरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण, क्युआर कोड, फेसबुक लाइव्हद्वारे प्रसारण, तसेच जनजागृतीसाठी जाहिरात फलक लावण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजक राजेश पांडे यांनी नियोजनाची माहिती दिली.


























