पुणे, (ता.२४) : पुणे जिल्ह्यात रस्ते अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, तसेच अपघातप्रवण ठिकाणी (ब्लॅकस्पॉट) व्यापक जनजागृती करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासह पोलीस, महामार्ग प्राधिकरण, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, “पुणे जिल्ह्यात सध्या एकूण ४२ ब्लॅकस्पॉट असून त्यामध्ये पुणे मनपा क्षेत्रात १५, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अंतर्गत २२, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे २, पायाभूत सुविधा विकास महामंडळाचा १ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील २ ब्लॅकस्पॉट आहेत. या सर्व ठिकाणी तातडीने लघुकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात याव्यात.”
या उपाययोजनांमध्ये दिशादर्शक फलक, बॅरिकेटिंग, राडारोडा साफसफाई, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग व वाहतूक प्रतिबंध यांचा समावेश असावा. “पोलीस प्रशासन व प्रादेशिक परिवहन विभागाने या उपाययोजनांची प्रत्यक्ष तपासणी करून पुढील एका महिन्यात अहवाल सादर करावा,” असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अपघातग्रस्त ठिकाणांची माहिती संकलित करून ठिकाणनिहाय अपघाताची कारणमीमांसा करावी आणि त्या आधारे सुरक्षात्मक उपाययोजना आखाव्यात, असे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. खडकवासला धरण चौक परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याचेही निर्देश देण्यात आले.
रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासनही श्री. डूडी यांनी दिले. यावेळी अधीक्षक अभियंता बहीर यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या कार्यवाहीचे संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.






























