पुणे (खडकवासला) : मागील काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणाचे जलसाठा वाढल्याने धरणातून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. सध्या तब्बल १५ हजार क्युसेकने पाणी सोडले जात असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
यापूर्वी 2 नंतर 4 हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. मात्र, धरण परिसरात जोरदार पावसाचा मारा सुरूच असल्याने आणि जलपातळी झपाट्याने वाढत असल्याने विसर्गात तब्बल सातपट वाढ करण्यात आली आहे. पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातंय.
दरम्यान, हवामान विभागाने पुणेसह अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदीकिनारी न जाण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
दरवर्षी पावसाळ्यात खडकवासला, पानशेत आणि वारसगाव धरणातून विसर्ग केल्यास पुणे शहर आणि उपनगरांतील निचांकी भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. यंदाही धरण क्षेत्रातील पावसाची तीव्रता पाहता, नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
नदीकाठच्या गावांमध्ये स्थानिक प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना दिल्या जात असून, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी सतत उद्घोषणा करून नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.


























