मृत व्यक्तीच्या तोंडात सोने: तुमचा जन्म 1990 च्या दशकातील असेल म्हणजेच तुम्ही 90’s किड्स असाल आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डातून शिकलेला असाल तर ‘बालभारती’च्या मराठीच्या पुस्तकातील ‘स्मशानातील सोनं’ हा धडा आजही नक्कीच तुमच्या लक्षात असणार. मजुरी करणारा भिमा कशाप्रकारे स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या मृतदेहांच्या तोंडातील सोनं मिळवण्यासाठी रात्री-अपरात्री जीवाची परवा न करता जातो याचं अगदी अंगावर काटा येणारं वर्णन या धड्यात थोर लेखक आणि समाजसुधारक अण्णा भाऊ साठेंनी केलं होतं.
मृत व्यक्तीच्या तोंडामध्ये सोन्याचा तुकडा का ठेवतात?
आजही दहावी या विषयावर बोलताना अनेकांना या धड्याची आवर्जून आठवण येते. येथे या धड्याची आठवण होण्यामागील कारण म्हणजे मृत व्यक्तीच्या तोंडात सोनं ठेवण्याची प्रथा! हिंदू धर्मामध्ये मयत व्यक्तीच्या तोंडामध्ये सोनं ठेवण्याची प्रथा आहे. या प्रथमेमागील नेमका अर्थ काय? मृत व्यक्तीच्या तोंडामध्ये सोन्याचा तुकडा का ठेवतात? अगदी कणभर का असेना असं सोनं का ठेवलं जातं? याचसंदर्भात आपण आज जाणून घेऊयात…
गंगाजल, तुळशीपत्र अन् सोनं
खरं तर हिंदू आणि सनातनच नाही तर सर्वाच धर्मांमध्ये मृत व्यक्तीला अखेरचा निरोप देण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. हिंदूंमध्येही मयत व्यक्तीच्या तोंडामध्ये सोनं, गंगाजल आणि तुळशीचं पान ठेवलं जातं. खरं तर गंगाजल आणि तुळशीचं पान या दोन गोष्टींचं पावित्र्य लक्षात घेता त्या मयत व्यक्तीच्या पार्थिवावर का ठेवल्या जातात याचा अंदाज बांधणं कठीण नाही. मात्र मयत व्यक्तीच्या तोंडामध्ये सोनं का ठेवतात हा प्रश्न अनेकांना पडतो. आज जवळपास एक लाख तोळ्याच्या आसपास पोहोचलेला हा मौल्यवान धातू मयत व्यक्तीच्या तोंडामध्ये ठेवण्याची प्रथा मागील अनेक शतकांपासून चालत आलेली आहे. मात्र मयत व्यक्तीच्या तोंडामध्ये असं सोनं का ठेवतात तुम्हाला ठाऊक आहे का?
नक्की वाचा >> ‘नासा’ला मंगळावर सापडली सोन्याची टेकडी! वैज्ञानिकही थक्क; हे ‘सोनं’ पृथ्वीवर आणण्यासाठी स्पेशल प्लॅन
…म्हणून मृत व्यक्तीच्या तोंडात ठेवतात सोनं
धार्मिक मान्यतांनुसार, सनातन धर्माप्रमाणे मृत्यू होणे म्हणजे केवळ नश्वर शरीर नाश पावतं. आत्म मात्र अमर असल्याचं मानलं जातं. मृत्यूनंतर आत्मा एका योनीतून दुसऱ्या योनीत प्रवेश करतो. म्हणूनच मयत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी आणि मोक्ष प्राप्त व्हावा या हेतूने मृत्यूनंतर पार्थिवावर काही विधी पार पाडले जातात. याच विधींमध्ये तोंडात सोनं ठेवण्याचाही समावेश होतो. गंगाजल आणि तुळीशपत्राप्रमाणेच सोन्याला सुद्धा हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व असून हा सर्वात पवित्र आणि शुभ धातू मानला जातो. पुराणातील कथांनुसार, मयत व्यक्तीच्या अंगावर अंत्यसंस्काराच्या वेळी सोनं असेल तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला आत्मिक शुद्धतेचा अनुभव मिळतो. याच आत्मिक शुद्धतेच्या माध्यमातून आत्म्याला मोक्ष प्राप्ती होते असं मानलं जातं. आता सोनं हे अत्यंत महागडं असल्याने मयत व्यक्तीच्या शरीरावरील सर्व दागिने काढून घेतले जातात आणि त्याच्या तोंडामध्ये अगदी किंचित असं सोनं ठेवलं जातं. पार्थिवाला अग्नी देताना पार्थिवाच्या संपर्कात थोडं जरी सोनं असलं तरी मोक्ष प्राप्ती लवकर होते अशी धार्मिक मान्यता आहे.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)



























