आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं. अशा काळात मुलांना पुस्तकांची गोडी लावणं हे मोठं आव्हान. विशेषतः ज्या मुलांच्या आयुष्यात पुस्तकं ही सहज उपलब्ध होणारी गोष्ट नाही, त्यांच्यापर्यंत वाचनाचा आनंद पोहोचवणं आणखी कठीण. मात्र, मुंबईतील एका ग्रंथपालांनी हेच आव्हान स्वीकारलं. मुलांना वाचण्यासाठी स्वतःच्या संग्रहातील पुस्तकं दिली आणि एका छोट्याशा प्रयत्नाला सुरुवात झाली. आज याच प्रयत्नांतून एक-दोन नव्हे, तर तब्बल 42 बालवाचनालय उभी राहिली आहेत. शरयू देसाई यांचा हा प्रवास केवळ पुस्तकं मुलांपर्यंत पोहोचवण्याचा नाही, तर त्यांच्या कल्पनांना, विचारांना आणि स्वप्नांना नवी दिशा देण्याचा आहे. खेळाच्या मैदानापासून पुस्तकांच्या जगापर्यंत… रत्नागिरी जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात वाढलेल्या शरयू देसाई यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. वर्तमानपत्रं आणि मासिकं वाचण्यात त्यांचा वेळ जायचा. मात्र, त्यांचं एक वेगळं स्वप्नही होतं. त्यांना खेळाची आवड होती आणि याच क्षेत्रात करिअर करण्याच्या इच्छेनं त्या मुंबईत आल्या. पण परिस्थिती बेताची असल्यामुळं त्यांना आपल्या स्वप्नाशी तडजोड करावी लागली. मन मैदानात होतं, पण जबाबदारीनं त्यांना पुस्तकांच्या भिंतीत बांधून ठेवलं…पुढे हाच मार्ग त्यांना पुस्तकांच्या जगात घेऊन गेला आणि याच पुस्तकांच्या माध्यमातून त्यांच्या कामाची ओळख दूरवर पोहोचली. शरयू देसाई यांनी मुंबईतील गोवंडी येथील ज्ञानसंपदा शाळेत ग्रंथपाल म्हणून काम केलं. ग्रंथालयात काम करताना पुस्तकं मुलांच्या विचारविश्वाला कसा आकार देतात, त्यांच्या कल्पनांना कशी चालना देतात, याचा अनुभव त्यांना मिळत गेला. मात्र, मुलांना पुस्तकं वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यापलीकडेही आपण काही करू शकतो, ही जाणीव त्यांना एका वेगळ्या अनुभवातून झाली. शरयू सांगतात, “मला काहीतरी नवीन करायचं आहे, हे मनात होतं; पण नेमकं काय करायचं, हे ठरवलं नव्हतं. आम्ही ‘साद माणूस’ नावाच्या संस्थेशी संलग्न झालो होतो. या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांत चांगलं काम करणारी माणसं येऊन कार्यशाळा घ्यायची. त्यांच्या सहवासात राहण्याची, त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली. त्यांचं काम पाहून आपणही काहीतरी केलं पाहिजे, असं वाटू लागलं. तिथूनच या प्रवासाची सुरुवात झाली.” या संस्थेनं पुढे शरयू काम करत असलेली शाळा दत्तक घेतली. शाळेत नवनवीन उपक्रम सुरू झाले. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात संवाद वाढला. मुलांशी एक वेगळं नातं तयार होत असतानाच कोरोनाचं संकट आलं आणि सगळंच थांबलं. मुलांच्या कंटाळ्यातून सापडली वाचनाची नवी वाट लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या. ऑनलाइन शिक्षण सुरू झालं; पण प्रत्येक मुलाकडं स्मार्टफोन किंवा इंटरनेटची सुविधा होतीच असं नाही. विशेषतः गोवंडीतील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या आणि कामगार कुटुंबांतून येणाऱ्या मुलांसाठी ही परिस्थिती अधिक कठीण होती. अनेकांच्या घरात मनोरंजनाची साधनं नव्हती, स्वतंत्रपणे वाचता येतील अशी पुस्तकंही नव्हती. शाळा बंद असल्यामुळं मुलांचा वेळ घरातच जात होता. त्याच काळात काही मुलांनी शरयू यांच्याशी संपर्क साधला. त्या सांगतात, “माझ्या शाळेतली मुलं ही प्रामुख्यानं कामगार कुटुंबांतून आणि झोपडपट्टी परिसरातून येणारी होती. त्यांच्याकडं मोबाईल क्वचितच होते. ऑनलाइन तासिका सुरू होत्या; पण घरात बसून मुलांना प्रचंड कंटाळा येत होता. त्यातल्या काही मुलांनी मला फोन करून विचारलं की, ‘मॅडम, तुम्ही शाळेत येऊन आम्हाला पुस्तक देऊ शकता का?'” मुलांची ही मागणी शरयू यांच्यासाठी एका नव्या उपक्रमाची सुरुवात ठरली. सुरुवातीला त्यांनी पुस्तकांच्या पानांचे फोटो काढून मुलांना व्हॉट्सॲपवर पाठवायला सुरुवात केली. मात्र, प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा आनंद वेगळाच असतो, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी मुलांच्या पालकांशी संपर्क साधला. मुलांपर्यंत पुस्तकं पोहोचवण्यासाठी पालकांची मदत मागितली. पालकांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मुलांच्या हातात प्रत्यक्ष पुस्तकं पोहोचू लागली. या उपक्रमाची सुरुवात शरयू यांनी स्वतःच्या पुस्तकांच्या संग्रहातून केली. त्यांच्याकडे असलेली पुस्तकं मुलांना वाचण्यासाठी दिली जाऊ लागली. या कामात त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या श्वेता नावाच्या मुलीनेही महत्त्वाची भूमिका बजावली. श्वेताच्या पालकांच्या मदतीने पुस्तकांची पहिली पिशवी वस्तीत पोहोचली. कोणाकडे किती पुस्तकं आहेत, कोणाची पुस्तकं वाचून झाली आहेत, याची नोंद ठेवण्यापासून ते पुस्तकांची देवाणघेवाण करण्यापर्यंतची जबाबदारी श्वेता सांभाळू लागली. एखादं पुस्तक वाचून झालं की ते दुसऱ्या मुलाकडे जायचं आणि त्या मुलाला वाचण्यासाठी नवीन पुस्तक मिळायचं. अशा पद्धतीनं पुस्तकं एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे पोहोचू लागली. एका पुस्तकातून अनेक मुलांपर्यंत वाचनाचा आनंद पोहोचवण्याची ही पद्धत पुढे ‘खजिना वाचनालय’ या संकल्पनेचा आधार ठरली. पुस्तकं दिली, पण वाचनाची गोडी कशी निर्माण केली? मुलांच्या हातात पुस्तकं देणं हा या उपक्रमाचा पहिला टप्पा होता. मात्र, पुस्तकं उपलब्ध झाली म्हणजे मुलांना आपोआप वाचनाची आवड निर्माण होईलच असं नाही. त्यामुळे शरयू यांनी वाचनाला वेगवेगळ्या उपक्रमांची जोड दिली. गोष्टी सांगणं, नाटकांचं अभिवाचन आणि ऑनलाइन वाचनतास अशा माध्यमांतून मुलांना पुस्तकांच्या जगाशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुलांना पुस्तकं दिल्यानंतर ती कायमस्वरूपी परत घेण्याची पद्धत ठेवली नाही. प्रत्येक गावातील मुलांची संख्या लक्षात घेऊन पुस्तकांचं वाटप केलं जाऊ लागलं. मुलांची संख्या कमी असेल तर प्रत्येक मुलामागे तीन, तर संख्या जास्त असेल तर पाच पुस्तकं देण्याचं नियोजन केलं जाई. त्यानंतर पुस्तकांची संख्या वाढवण्याची जबाबदारी मुलांवरच सोपवण्यात आली. याबाबत शरयू सांगतात, “मुलांना मी सांगितलं की, तुम्ही तुमच्या वाढदिवसाला एक पुस्तक विकत घ्या. कोणाला भेट द्यायची असेल, तर पुस्तक द्या. शक्य असेल तर ग्रंथालयासाठीही पुस्तक द्या. अशा पद्धतीनं पुस्तकांची संख्या वाढवता येईल. मुलांनीही या गोष्टीचा विचार करायला सुरुवात केली आणि त्यांकडेही पुस्तकांचा संग्रह वाढू लागला. मी आजही माझ्या स्वखर्चानं मुलांना पुस्तकं देते.” मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांतील पुस्तकं मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. पुस्तकं वाचल्यानंतर मुलं त्यातील गोष्टींवर एकमेकांशी चर्चा करू लागली. एखाद्या पात्राबद्दल बोलणं, गोष्टीत पुढे काय घडेल याचा अंदाज बांधणं, वाचलेल्या गोष्टी इतरांना सांगणं अशा गोष्टींमधून मुलांचा पुस्तकांशी संवाद वाढू लागला. पुस्तक वाचणं ही केवळ एकट्यानं करायची गोष्ट न राहता, एकत्र येऊन अनुभवण्याची प्रक्रिया बनली. याच सहभागातून वाचनालयाची संकल्पना एका वस्तीतून दुसऱ्या वस्तीत पोहोचू लागली. पुस्तकांच्या देवाणघेवाणीबरोबरच मुलांमध्ये वाचनाची आवड वाढवण्याचं कामही सुरू राहिलं. या छोट्याशा प्रयत्नाचा विस्तार होत गेला आणि आज शरयू देसाई यांच्या पुढाकारातून तब्बल 42 बालवाचनालयं उभी राहिली आहेत. ती मुंबई, रत्नागिरी, लांजा, राजापूर, रायगड, सांगली अशी राज्यातल्या अनेक भागात या वाचनालयाची साखळीच झाली आहे. पुस्तकातील पात्रं प्रत्यक्षात आणली शरयू यांच्यासाठी वाचन म्हणजे केवळ पुस्तकातील शब्द वाचून संपवणं नाही. त्या शब्दांमधून मुलांनी काहीतरी शिकावं, त्यावर विचार करावा आणि स्वतःच्या पद्धतीने व्यक्त व्हावं, यासाठीही त्या प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या संमेलनात पुस्तकांवर आधारित नाटकं आणि पात्रांच्या माध्यमातून माहिती सादर करण्यावर भर दिला जातो. शरयू सांगतात, “आम्ही केवळ पुस्तकांपुरतं मर्यादित राहत नाही. दरवर्षी एक संमेलन आयोजित करतो. त्यामध्ये एखादं पुस्तक निवडून त्यातील पात्रं मुलांसमोर आणली जातात. उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची कथा असेल, तर त्या पात्रांच्या माध्यमातून मुलांना त्यांची माहिती मिळते. मनोरंजनातून माहिती मिळत असल्यामुळे मुलांमध्ये ती गोष्ट वाचण्याची उत्सुकता निर्माण होते.” या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे नाटक सादर करण्यासाठी केवळ मुलंच पुढे येतात असं नाही, तर गावातील हौशी नागरिकही त्यात सहभागी होतात. एखाद्या गावात नाटक सादर करायचं असेल, तर त्याची आधीच माहिती दिली जाते. त्यानंतर स्थानिक लोकही या प्रक्रियेत सहभागी होतात. त्यामुळे पुस्तकातून सुरू झालेला अनुभव नाटकाच्या माध्यमातून गावकऱ्यांपर्यंत पोहोचतो. मुलांसोबत पालकांचाही या उपक्रमात सहभाग असतो. कोरोनाच्या काळात सुरू झालेल्या ऑनलाइन तासिकांमध्येही याच पद्धतीचा वापर केला जात होता. पहिल्या पाच दिवसांत वक्ते मुलांशी संवाद साधत आणि त्यानंतर मुलांना शिकलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष उपयोग करायला सांगितलं जाई. त्या सांगतात, “कथाकथनाचा कार्यक्रम झाला, तर मुलांना प्रत्यक्ष एखादी कथा सांगायला लावायची. काही मुलं स्वतःच्या कथा तयार करायची. त्यामुळे एकीकडे मुलं या उपक्रमांचा आनंद घेत होती, तर दुसरीकडे त्यांचं वाचनही वाढत होतं.” ऐकलेली गोष्ट स्वतःच्या शब्दांत सांगणं, स्वतःची कथा तयार करणं आणि ती इतरांसमोर सादर करणं, या प्रक्रियेतून मुलांना व्यक्त होण्याची संधी मिळाली. पुस्तकांच्या माध्यमातून त्यांना केवळ नवी माहिती मिळाली नाही, तर स्वतःच्या कल्पना मांडण्याचा आत्मविश्वासही मिळू लागला. 14 किलोमीटर दूर जाऊन नाटक सादर केलं या उपक्रमातून मुलांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता आणि सहभाग अनेक अनुभवांतून दिसून आला. ऑनलाइन वर्ग सुरू असताना गावाकडे इंटरनेटची रेंज मिळत नसे. त्यामुळे तास चुकू नये म्हणून काही मुलं डोंगरावर जाऊन बसायची. पुस्तकं आणि शिकण्याची ओढ त्यांना अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देत होती. शरयू यांना स्वराज नावाच्या मुलाची आठवण विशेषत्वाने सांगावीशी वाटते. त्या सांगतात, “आमच्याकडे स्वराज नावाचा एक मुलगा होता. तो चौथीत शिकत होता आणि खूप ॲक्टिव्ह होता. त्याने शिवाजी महाराजांवर आधारित एकपात्री नाटक बसवलं होतं. एकदा ऑनलाइन क्लास सुरू असताना लाईट गेली. आपली मेहनत वाया जाऊ नये म्हणून तो आपल्या गावापासून तब्बल 14 किलोमीटर दूर गेला आणि तिथे कोणाच्या तरी घरी जाऊन त्याने ते नाटक सादर केलं. तेव्हा मला खरंच खूप आश्चर्य वाटलं की मुलं वेड्यासारखी या गोष्टीच्या मागे लागली आहेत. इतर गोष्टींचं वेड लागण्यापेक्षा वाचनाचं वेड हे कधीही चांगलच. त्यामुळं मनाला समाधान मिळतं.” एका मुलानं स्वतः शिकलेल्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेली ही धडपड शरयू यांच्या उपक्रमाचं महत्त्व अधोरेखित करते. पुस्तकातून मिळालेली माहिती केवळ स्वतःपुरती न ठेवता ती इतरांसमोर मांडण्याची इच्छा मुलांमध्ये निर्माण होऊ लागली होती. वाचता येत नव्हतं, आज सुंदर वाचतो! वाचनाच्या या प्रवासात प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत सारखी नसते, याची जाणीव शरयू यांनी ठेवली. काही मुलांना पुस्तकं वाचण्याची आवड असते; पण त्यांना वाचन शिकण्यासाठी इतरांपेक्षा अधिक वेळ आणि मदतीची गरज असते. अशाच एका मुलाच्या बाबतीत आलेला अनुभव त्यांच्यासाठी समाधान देणारा ठरला. शरयू सांगतात, “आमच्या शाळेत एक मुलगा होता. त्याला लर्निंग डिसॅबिलिटीची समस्या होती. त्यामुळे त्याला वाचता येत नव्हतं; पण गोष्टी ऐकण्याची त्याला खूप उत्सुकता होती. मग आम्ही त्याला वाचायला शिकवायचं ठरवलं. त्याला बाराखडी अगदी सुरुवातीपासून शिकवायला सुरुवात केली. त्याला क्लेच्या माध्यमातून आम्ही बाराखडी शिकवली. आता तो इतर मुलांप्रमाणे खूप सुंदर वाचतो.” या अनुभवातून मुलाला शिकण्याची संधी आणि योग्य मदत मिळाली, तर त्याच्यातील क्षमता विकसित होऊ शकते, हे दिसून येतं. प्रत्येक मुलाला स्वतःच्या गतीने शिकता यावं, त्याला आवडणाऱ्या गोष्टींमधून शिकण्याची संधी मिळावी आणि त्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावं, यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित होते. पुस्तकांच्या पलीकडेही जपली मुलांची काळजी शरयू यांच्या कामाचा आवाका केवळ वाचनालयांपुरता मर्यादित राहिलेला नाही. मुलांना शिकण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी योग्य वातावरण मिळणं महत्त्वाचं आहे, असं त्या मानतात. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक मुलांना मूलभूत गरजांसाठीही संघर्ष करावा लागतो. अशा वेळी त्यांचं शिक्षण आणि त्यांच्यातील क्षमता विकसित होण्याची प्रक्रिया अडखळू नये, यासाठीही मदतीचे प्रयत्न करण्यात आले. शरयू सांगतात, “मुलांना व्यासपीठ निर्माण करून देणं खूप महत्त्वाचं असतं. ही मुलं आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कुटुंबांतून येतात. त्यामुळे गरज पडली, तर आम्ही मुलांसाठी जेवणाचे डबे आणायचो. त्यांच्या शाळेची फी भरण्यासाठीही मदत केली आहे. काही मुलं तर एक वेळचं जेवण मिळावं म्हणून शाळेत यायची. ज्या दिवशी शाळेत जेवण नसायचं, त्या दिवशी मुलांनी घरी बसून राहू नये म्हणून शिक्षक त्यांच्यासाठी डबे घेऊन यायचे. या कामात सगळ्यांचा पाठिंबा मिळाला.” मुलांना पुस्तकं देण्यापासून सुरू झालेल्या या प्रवासात त्यांचं शिक्षण, त्यांची भूक, त्यांना व्यक्त होण्यासाठी मिळणाऱ्या संधी आणि त्यांचा आत्मविश्वास या गोष्टीही जोडल्या गेल्या. पुस्तकं मुलांच्या हातात देणं हा एक भाग होता; पण त्या पुस्तकांमधून त्यांना पुढे जाण्याची संधी मिळावी, यासाठी शरयू आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांनी प्रयत्न केले. शरयू यांनी हा उपक्रम एक मराठी माध्यमाच्या शाळेत सुरु केला होता. सध्या त्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपली जबाबदारी पार पडत आहेत. तिथेही त्यांनी चांगला आपला जम बसवला आहे. मोबाईलच्या काळातही पुस्तकांची गरज कायम आज डिजिटल माध्यमांमुळे माहिती मिळवणं सोपं झालं आहे. पुस्तकंही ऑनलाइन वाचता येतात. मात्र, इंटरनेटवर उपलब्ध असलेली प्रत्येक माहिती खरी असेलच असं नाही. त्यामुळे डिजिटल माध्यमांचा वापर करतानाच पुस्तकांचं महत्त्वही लक्षात घेतलं पाहिजे, असं शरयू यांचं मत आहे. त्या सांगतात, “आजच्या तरुण पिढीने केवळ सोशल मीडियापुरतं मर्यादित न राहता त्याचा उपयोग कसा करून घेता येईल, यावर भर द्यायला हवा. बदलत्या काळानुसार आपणही बदललं पाहिजे. ऑनलाइन पुस्तकं वाचायला मिळत असतील, तर मुलांनी ती आवर्जून वाचावीत. पण ऑनलाइन माध्यमांवर असलेली प्रत्येक गोष्ट खरी असेलच असं नाही. अशा वेळी पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो.” शरयू देसाई यांच्या प्रवासात पुस्तकं हे केवळ वाचनाचं साधन राहिलेलं नाही. स्वतःच्या संग्रहातील पुस्तकं मुलांना देण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रयत्न आज बेचाळीस बालवाचनालयांपर्यंत पोहोचला आहे. या प्रवासात मुलांना पुस्तकं मिळाली, वाचनाची आवड निर्माण झाली, गोष्टी सांगण्याची आणि स्वतःच्या कल्पना मांडण्याची संधी मिळाली. काहींना नव्या गोष्टी शिकण्याची प्रेरणा मिळाली, तर काहींना स्वतःमधील क्षमता ओळखता आली. एकेकाळी खेळाच्या मैदानावर करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शरयू यांना परिस्थितीमुळे वेगळा मार्ग निवडावा लागला. मात्र, पुस्तकांच्या सहवासात त्यांना कामाचा नवा अर्थ सापडला. आज त्याच पुस्तकांच्या माध्यमातून त्या अनेक मुलांच्या आयुष्यात नवी स्वप्नं रुजवत आहेत. कारण, पुस्तकाची खरी ताकद ते किती जणांनी वाचलं यातच नसते; तर ते वाचल्यानंतर एखाद्याच्या विचारांत, कल्पनांत आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात काय बदल घडतो, यात असते. शरयू देसाई यांच्या स्वतःच्या पुस्तकांपासून सुरू झालेल्या प्रवासाने आज अनेक मुलांसाठी नव्या शक्यतांची दारं उघडली आहेत. एका पुस्तकाने सुरू झालेला हा प्रवास आता बालवाचनालयांच्या माध्यमातून अनेक मुलांच्या हातात नवं जग देत आहे. नोट : ( शरयू देसाई यांच्या वाचनालयात अधिकाधिक पुस्तकांची भर पडावी आणि वाचनाची आवड असणाऱ्या प्रत्येकाला ज्ञानाची दारे खुली व्हावीत, यासाठी तुम्ही सहकार्य करू शकता. तुमच्याकडे असलेली वाचून झालेली, सुस्थितीतील पुस्तकं या वाचनालयाला भेट देऊ शकता. तुमच्यासाठी कपाटात पडून असलेलं एखादं पुस्तक कदाचित दुसऱ्या कोणाच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतं. पुस्तक देण्यासाठी खाली दिलेल्या ई-मेल आयडी किंवा मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ई-मेल आयडी – sharayudesai1975@gmail.com ,मोबाईल क्रमांक – 9819023740 )
Source link
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा भन्नाट प्रवास 'ज्ञानदीप'मध्ये!
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Gemini Financial Gain & Capricorn Promotion 2026
9 तासांपूर्वीकॉपी लिंकसोमवार, 2 नोव्हेंबर रोजी मिथुन राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीची शक्यता आहे आणि दीर्घकाळापासून रखडलेले पैसेही परत मिळू शकतात. मकर राशीच्या...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
























