TATA पंच EV 2026 : कारप्रेमी आणि भारतीय ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवत काही उत्तमोत्तम कारचे मॉडेल सादर करणाऱ्या टाटा मोटर्सनं पुन्हा एकदा सर्वांचच लक्ष वेधत टाटा पंच ईव्हीचं फेसलिफ्ट मॉडेल नुकतंच सादर केलं. यावेळी कैक बदलांसह कंपनीनं ही कार रिलाँच केली असून, यामध्ये लहानमोठे असे अनेक लक्षवेधी बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
कारची बॅटरी, रेंज, चार्गिंग क्षमता यावर कंपनीनं लक्ष केंद्रीत करत नव्यानं लाँच करण्यात आलेली ही कार आधीपेक्षा अधिक अंतर ओलांडते आणि तिच्या बॅटरीला चार्जिंगसाठी लागणारा वेळसुद्धा कमी आहे. कारच्या किमतीतही कंपनीनं बदल केले असून, त्यामुळं ग्राहकांच्या पसंतीस उतरून नव्या कारसाठी बरीच मंडळी हा पर्यायसुद्धास चाचपडून पाहत आहेत.
कारची नवी किंमत आणि BaaS प्लान आहे काय?
कंपनीकडून करण्यात आलेल्या बदलांमध्ये कारच्या किमतीचा समावेश असून, Tata Punch EV फेसलिफ्टची एक्स शोरुम किंमत आहे 9.69 लाख रुपये ते 12.59 लाख रुपये. ग्राहकांनी जर BaaS म्हणजेच बॅटरी सब्सक्रिप्शन प्लान निवडला, तर या कारची किंमत 6.49 लाखांपासून सुरू होतेय.
BaaS प्लान अंतर्गत कारच्या बॅटरीची पूर्ण किंमत एकदाच देणं अपेक्षित नसते. कार जितकी किलोमीटर चालेल त्या हिशोबानं ग्राहकांना बॅटरीचे पैसे द्यावे लागतात. ज्यामुळं कार खरेदीचा विषय आता सामान्यांच्या खिशाला परवडणारा आणि अधिक सोपा ठरत आहे. कंपनीनं हा पर्याय यापूर्वी उपलब्ध करून दिला नसल्यानं हा एक मोठा बदल ठरत आहे.
बॅटरी, रेंज आणि इतर फिचरसुद्धा महत्त्वाचे
नव्या Punch EV मध्ये जुन्या 25 kWh, 35 kWh बॅटरी न देता 30 kWh आणि 40 kWh अशा मोठ्या बॅटरी देण्यात आल्या आहेत. ज्यामुळं कारची रेंज सोप्या भाषेत मायलेज हे 265, 365 किमीवरून थेट 375 आणि 468 किमीवर गेली आहे. कारच्या बॅटरी चार्जिंमध्येसुद्धा सुधारणा करण्यात आल्या असून, आता ही बॅटरी 50 किलोवॅटऐवजी 65 किलोवॅटवर चार्ज होईल. बॅटरी चार्जिंगसाठी लागणारा वेळसुद्धा 26 मिनिटांपर्यंत आणण्यात आला आहे. एसी चार्जिंगची क्षमता मात्र आधीप्रमाणंच 7.2 किलोवॅट ठेवण्यात आली आहे.
फेसलिफ्ट मॉडेलमध्ये कारचे काही जुने फिचरसुद्धा कायम ठेवण्यात आले आहेत. ज्यामध्ये 6 एअरबॅग, ईएसपी, 360 डिग्री कॅमेरा आणि इलेक्ट्रीक पार्किंग ब्रेक असे फिचर देण्यात आले आहेत. नव्या फिचरमध्ये कारला हाय बीम असिस्ट आणि इंटरफेसमध्ये काही बदलांसह सादर करण्यात आलं आहे.





























