चित्रपट दिग्दर्शक एमएम बेग मृत आढळले: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक एम एम बेग आपल्या घरात मृतावस्थेत आढळले आहेत. यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. एम एम बेग प्रसिद्ध बालकलाकार बेबी गुड्डूचे वडील आहेत. ही बातमी त्यांचे पब्लिसिस्ट हनीफ झवेरी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली. एम एम बेग 70 वर्षांचे होते. मागील काही काळापासून ते एकटे राहत होते.
हनीफ झवेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसापांसून ते आजारी होते. बऱ्याच दिवसांपासून ते दिसत नव्हते. यामुळे शेजाऱ्यांनी प्रशासनाला फोन करुन माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना घरातून दुर्गंध येत असल्याने संशय आला.
“मागील बऱ्याच काळापासून ते आजारी होते. मागील पाच दिवसांपासून ते घऱाबाहेरच न आल्याने शेजाऱ्यांना शंका आली. घरातून दुर्गंध येत असल्याने त्यांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिला असता आतमध्ये एम एम बेग यांचा मृतदेह पडलेला होता. यानंतर त्यांच्या मुलीला फोन करुन यासंदर्भातील माहिती देण्यात आली. रात्री 1.30 ते 2 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह कुपर रुग्णालयात नेण्यात आला. ते फार प्रेमळ व्यक्ती होते. मी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करतो,” असं हनीफ झवेरी म्हणाले आहेत.
शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार, ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
बेग यांनी जे ओम प्रकाश, विमल कुमार आणि राकेश रोशन यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आदमी खिलोना है (1993), जैसी करनी वैसी भरनी (1989), कर्ज चुकाना है (1991), काला बाजार (1989), आणि किशन कन्हैया (1990) यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांचा सहभाग होता. आपल्या तांत्रिक कौशल्यामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती.
नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत मासूम गवाह चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. पण हा चित्रपट रिलीजच झाला नाही. त्यांनी शिल्पा शिरोडकरची भूमिका असणाऱ्या छोटी बहूचेही (1994) दिग्दर्शनही केलं.
हनीफ यांनी बेग यांचं चित्रपटसृष्टीतील योगदान आणि खासकरुन रोशन कुटुंबाशी असणाऱ्या संबंधावर भाष्य केलं. “बेग साहेबांचं राकेश रोशन साहेबांशी चांगलं समीकरण होतं. हृतिक रोशनला त्यांनी उच्चार, आवाजातील बदल आणि संवादांमध्ये मदत केली. याचं कारण त्यांना या गोष्टी चांगल्या प्रकारे माहित होत्या. बेग साहेब हृतिकला तोंडी संवादांमध्ये मदत करायचे. हे त्याच्या कहो ना प्यार है (2000) या पहिल्या चित्रपटाच्या खूप आधी घडले होते,” असं हनीफ यांनी सांगितलं.
बेगची यांची मुलगी, बेबी गुड्डू हिचं खरं नाव शाहिंदा बेग होतं. 1980 च्या दशकातील प्रसिद्ध बाल कलाकारांपैकी त्या एक होत्या. त्यांनी आखीर क्यों सारख्या चित्रपटात काम केलं. याशिवाय नगीना (1986), प्यार किया है प्यार करेंगे (1986), आणि औलाद (1987) या चित्रपटातील भूमिकांनी आपली ओळख निर्माण केली होती.




























