Auto News : इंधनाचे वाढते दर आणि या दरांमुळं खिशाला बसणारा फटका पाहता भारतात सध्या अनेक वाहनधारक इलेक्ट्रीक वाहनांना पसंती देताना दिसत आहेत. काळाती हीच गरज लक्षात घेत एमजी मोटर्स, टाटा अशा बऱ्याच कंपन्यांनीसुद्धा त्यांच्या इलेक्ट्रीक कार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. अशा या कंपन्या EV क्षेत्रात जम बसवत नाहीत, तोच त्यांना आव्हान देत आहे गुरुग्रामची एक स्टार्टअप कंपनी.
गुरुग्रामच्या कंपनीचं टाटाच्या कारना आव्हान?
MG Comet EV, Tata Tiago EV अशा कारना थेट टक्कर देणारी ही कंपनी आहे ब्लिंक मोबिलिटी. (Blinq) प्राथमिक माहितीनुसार सध्या कंपनीकडून एका किफायतशीर ईव्हीची चाचणी सुरू असून, सोशल मीडियावरल या कारचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे. ज्यामुळं ही कार नेमकी कशी असेल याबाबतची कारप्रेमींची उत्सुकता वाढताना दिसत आहे.
काय असेल या कारची किंमत?
एका व्लॉगरच्या माहितीनुसार Car1 असं या कारचं नाव असून, या मॉडेलच्या अंतिम नावावर मात्र अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. सध्या ही कार रस्त्यावर चाचणीदरम्यान पाहायला मिळत असून, त्यात असणाऱ्या त्रुटींवरही काम केलं जात आहे. प्राथमिक माहितीनुसार या कारची किंमत साधारण 4 लाखांच्या श्रेमीत असू शकते.
कंपनीकडून ही किंमत निश्चित केल्यास ही किंमत एखाज्या तीनचाकी वाहनाच्या नजीक जाणारी असून, फिचरच्या बाबतीत कार एमजी कॉमेट ईव्ही आणि टिएगो ईव्ही यांना आव्हान देईल. या कारची जमेची बाजू ठरेल ते म्हणजे एक आकर्षक डिझाईन.
नॅनोसारखीच दिसतेय ही कार…
प्रथमदर्शनी ही कार नॅनोचं आधुनिक रुप असल्याचं लत्षात येतं. मात्र, या कारचं हे बेस वर्जन आहे की टॉप मॉडेल हे मात्र कळू शकलेलं नाही. कारच्या पुढं एक काळी पट्टी असून त्यावरच कंपनीचा लोगो पाहता येत आहे. कारला कोणतंही ग्रिल नाही. शिवाय तिचं पॅनल हलकं असूनही तितकंच भक्कम असल्याचं लक्षात येतं. कंपनीच्या दाव्यानुसार हे स्टीलपेक्षाही मजबूत आहे. शहरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी पाहता या कारचा आकार लहान ठेवण्यावरच कंपनीनं भर दिला आहे.
सध्या ब्लिंक मोबिलिटीकडून कारच्या बॅटरीवर काम सुरू असून ही बॅटरी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी असेल असं सांगण्यात येतं. कंपनी सध्या अशा यंत्रणेवर काम करत आहे जिथं बॅटरी सहजपणे कारमध्ये लावता आणि काढता येऊ शकते. महत्त्वाची बाब म्हणजे बड्या कंपन्यांना आव्हान देणारी ब्लिंक कंपनी आयआयटी दिल्लीच्या निकेश बिष्टची कल्पना आहे. या कंपनीत अशी मंडळी काम करतात ज्यांनी टेस्लासारख्या कंपनीसाठीही काम केलं आहे. त्यामुळं आता ही लहानशी कार सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करते का, हे पाहणं औत्सुक्याचं असेल.





























