सायबर क्राईम बातम्या ऑनलाइन गेम फसवणूक: गेम खेळा आणि पैसे जिंका या जाळ्यात अडकत एका महिलेला थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्याचा प्रकार छत्रपती संभाजी नगरात घडला आहे. गृहिणी असलेली ही महिला या गेममध्ये सुरुवातीला पैसे जिंकले नंतर ती पाशात अडकत गेली आणि पाच लाख रुपये तिने गमावले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तिचे प्राण वाचले. मात्र गेमचं व्यसन अगदी जीवावर बेतलं असतं अशी स्थिती नेमकी कशी निर्माण झाली? या महिलेसोबत नक्की घडलं काय? हे जाणून घेऊयात…
या महिलेसोबत नक्की घडलं काय?
‘घरी बसून पैसे कमवा, गेम खेळा आणि पैसे जिंका…’ अशा जाहिराती, लिंक आणि सोशल मीडियावरील आकर्षक ऑफरमुळे ऑनलाइन गेमचे जाळे अधिक घट्ट होताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ऑनलाइन गेमच्या आहारी जाऊन केवळ तरुणच नाही, तर गृहिणी असलेल्या महिलाही मोठ्या प्रमाणावर पैसे गमावत आहेत. छत्रपती संभाजी नगरमधील ही घटना प्रत्येकाला हादरवणारी आहे. गृहिणी असलेल्या 35 वर्षीय महिलेला मोबाईलवर पैसे जिंकणारा एक गेम सापडला. यातून तिला सुरुवातीला आर्थिक फायदा झाला. त्यामुळेच तिला या गेमचं व्यसन लागलं. सुरुवातीला तिने 40 ते 50 हजार जिंकले मात्र जेवढं जास्त गुंतवणार तेवढे जास्त जिंकणार या आमिषाला बळी पडून तिने घरचे दागिने विकले बहिण भावाकडून पैसे उसने घेतले आणि तब्बल 4 ते 5 लाख रुपये या गेमच्या नादापायी त्यात गुंतवले.
नंतर ही महिला सगळे पैसे या गेममध्ये गमावून बसली. त्यानंतर तिने थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घरच्यांनी वेळीच सावरून या महिलेला मनोविकार तज्ञाकडे नेलं. हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि तिथं या सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला. तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे ही तिच्या घरच्यांना ठाऊक नव्हतं इतक्या गुपचूपपणे ती हा गेम खेळत होती.
डॉक्टरांचं म्हणणं काय?
जिल्हा रुग्णालयातील मनोविकार तज्ज्ञ डॉ जितेंद्र डोंगरेंनी, “ही फक्त एक घटना नाही तर गेल्या दोन महिन्यात तब्बल सहाहून अधिक महिला याच मूळ उपचारासाठी माझ्याकडे आल्यात,” असं सांगितलं. तरुण मुलं, मुली आणि खास करून घरी असणाऱ्या गृहिणी आता या पाशात अडकत असल्याचे डॉक्टर सांगतात. असल्या रुग्णांवर उपचार करताना खूप सावध रहावं लागतं असंही डॉक्टर सांगतात.
सावध व्हा
ऑनलाइन गेम आणि त्यातून मिळणाऱ्या पैशाच्या माध्यमातून अनेक जण उध्वस्त झाले आहेत. अनेकांना या गेमचं व्यसन रस्त्यावर घेऊन आलं आहे. त्यात आता जीवाशी जायची ही वेळ आली आहे. त्यामुळे महिलांनो घरी बसून पैसे कमवता येणे शक्य नाही. असल्या गेमच्या आहारी जाऊ नका आणि जीव धोक्यात घालू नका हे समजून घेणे गरजेचे आहे.






























