T20 विश्वचषक 2026 : 7 फेब्रुवारी पासून आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 ला (T20 World Cup 2026) सुरुवात होणार आहे. मात्र या स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची परवानगी दिली, पण 15 फेब्रुवारी रोजी नियोजित असलेल्या भारत विरुद्ध ग्रुप स्टेज सामना खेळण्यास मात्र नकार देत त्यावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. पाकिस्तानने घेतलेल्या या भूमिकेनंतर आयसीसीने सुद्धा पत्रक जाहीर करून याबाबत त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलंय. तर पाकिस्तानला सुद्धा काही गोष्टी सुनावल्या आहेत.
भारताविरुद्ध सामन्यावर बहिष्काराची घेतली भूमिका :
बांगलादेशला आयसीसीने स्पर्धेतून रिप्लेस केल्यावर पाकिस्तानने बांगलादेशची पाठराखण करत स्वतःच्या स्पर्धेतील सहभागाबद्दल सुद्धा अनिश्चितता दाखवली होती. सोमवारपर्यंत पाकिस्तान आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मधील सहभागाबद्दल अंतिम निर्णय जाहीर करणार होता. दरम्यान रविवारीच पाकीस्तान सरकारने त्यांच्या संघाला आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला, पण 15 फेब्रुवारी रोजी नियोजित असलेल्या भारत विरुद्ध सामन्यावर मात्र पाकिस्तानचा क्रिकेट संघ बहिष्कार टाकणार आहे.
काय म्हणालं आयसीसी?
पाकिस्तान सरकारने टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत त्यांच्या संघाला भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिल्यावर यावर आयसीसीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. यात आयसीसीने म्हटले की, ‘2026 च्या आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कपमध्ये निवडकपणे सहभागी होण्यासाठी पाकिस्तान सरकारने त्यांच्या राष्ट्रीय संघाला निर्देश देण्याच्या निर्णयाबाबत दिलेल्या विधानाची आयसीसीने नोंद घेतली आहे.
आयसीसी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) कडून अधिकृत संदेशाची वाट पाहत असताना, निवडक सहभागाची ही भूमिका जागतिक क्रीडा स्पर्धेच्या मूलभूत तत्त्वांशी जुळवून घेणे कठीण आहे जिथे सर्व पात्र संघांना कार्यक्रम वेळापत्रकानुसार समान अटींवर स्पर्धा करण्याची अपेक्षा आहे.
आयसीसी स्पर्धा क्रीडा अखंडता, स्पर्धात्मकता, सातत्य आणि निष्पक्षतेवर आधारित असतात आणि निवडक सहभागामुळे स्पर्धांची भावना आणि पावित्र्य कमी होते. आयसीसी राष्ट्रीय धोरणाच्या बाबतीत सरकारच्या भूमिकेचा आदर करते, परंतु हा निर्णय जागतिक खेळाच्या किंवा जगभरातील चाहत्यांच्या, ज्यामध्ये पाकिस्तानमधील लाखो चाहत्यांचा समावेश आहे, कल्याणाच्या हिताचा नाही.
आयसीसीला आशा आहे की पीसीबी त्याच्या स्वतःच्या देशातील क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण आणि दीर्घकालीन परिणामांचा विचार करेल कारण याचा जागतिक क्रिकेट परिसंस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्याचा तो स्वतः सदस्य आणि लाभार्थी आहे.
आयसीसीची प्राथमिकता आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक यशस्वीरित्या पार पाडणे ही आहे, जी पीसीबीसह सर्व सदस्यांची जबाबदारी देखील असली पाहिजे. पीसीबीने सर्व भागधारकांच्या हिताचे रक्षण करणारा परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढावा अशी अपेक्षा आहे’.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : भारताविरुद्ध न खेळून पाकिस्तानने स्वतःच्याच पायावर धोंडा मारणार, पाकिस्तानला होणार कोट्यवधींचं नुकसान
भारत – पाकिस्तान संघ एकाच ग्रुपमध्ये :
टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत एकूण 20 संघांचा सहभाग असणार आहे. या संघांना एकूण 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं असून यात ग्रुप ए मध्ये भारत आणि पाकिस्तान या संघांचा समावेश आहे. ग्रुप एमध्ये भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड, नामिबिया असे पाच संघ असून हे एकमेकांविरुद्ध ग्रुप स्टेज सामना खेळतील. यापैकी 15 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ग्रुप स्टेज सामना हा श्रीलंकेच्या कोलंबो येथे होणार होता. मात्र याच सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून हा सामना खेळण्यास नकार दिला आहे. आता यावर आयसीसी काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. रविवारी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाला (Pakistan Cricket) आयसीसी वर्ल्ड टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी मान्यता दिली आहे, मात्र 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर त्यांनी बहिष्कार टाकला आहे.






























