सूर्यकुमार यादव कर्णधारपदावर इरफान पठाण: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वगुणांचं कौतुक केलं आहे. पण सातत्यपूर्ण कामगिरी करूनही भारताच्या या कर्णधाराला योग्य दाद देण्यात आलेली नाही अशी खंतही त्याने व्यक्त केली आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली आणि सूर्यकुमारकडे कर्णधारपद आलं. तेव्हापासून त्याने संघाचा कर्णधार म्हणून आपले वर्चस्व सातत्याने सिद्ध केलं आहे. तसंच 2026 वर्ल्डकप जिंकण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे.
सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने आक्रमक आणि निर्भीड क्रिकेट शैलीचा अवलंब केला आहे, ज्याला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचाही पाठिंबा आहे. याचे परिणामही दिसू लागले आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकल्या आहेत. तसंच मायदेशात आपले वर्चस्व गाजवले आहे आणि आशिया कप जिंकून सर्वांना दखल घेण्यास भाग पाडलं आहे.
इरफान पठाणने सूर्यकुमारच्या नेतृत्वाला योग्य दाद, कौतुक मिळत नसल्याने प्रश्न उपस्थित केला आहे. इतकी चांगली कामगिरी केल्यानंतरही कर्णधार म्हणून त्याने पाडलेली छाप याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं त्याने म्हटलं आहे. सूर्यकुमारने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांममध्ये मिळवलेल्या उत्कृष्ट यशाकडे सूर्यकुमारने लक्ष वेधलं. कर्णधार म्हणून त्याने मिळवलेल्या यशाची सध्या मिळत असलेल्या मान्यतेपेक्षा अधिक दखल घेतली जाणे आवश्यक आहे असं मत त्याने मांडलं आहे.
“पण सूर्यकुमार यादवला दिलं जावं तितकं महत्व देताना दिसत नाही. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून त्याचा विजयाचा दर 84 टक्के आहे, जो आपल्याकडे सर्वाधिक आहे. आपण कर्णधार म्हणून त्याचा का गौरव करत नाही? लोक त्याला तितकं श्रेय देत नाहीत,” असं इरफान पठाणने रेव्हस्पोर्ट्झला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
त्याने मैदानावर एक कर्णधार म्हणून सूर्याच्या कौशल्यांवरही प्रकाश टाकला. तसंच त्याची रोहित शर्माशी तुलना केली आणि भारतीय कर्णधार ज्या प्रकारे आपल्या गोलंदाजांना पाठिंबा देतो व त्यांना सांभाळून घेतो, त्याबद्दल त्याचे कौतुक केले.
“तो गोलंदाजांचा कर्णधार आहे. ज्या प्रकारे तो गोलंदाजांची काळजी घेतो, त्यात मला त्याच्यात रोहित शर्माची झलक दिसते. तो खूप उत्साही असतो, खेळात पूर्णपणे सामील असतो आणि अनेकदा तो संघासाठी योग्य निर्णय घेतो,” असं पठाण पुढे म्हणाला
पठाणने एका मोठ्या स्पर्धेपूर्वी सूर्यासाठी आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले आणि सांगितले की, कर्णधारासाठी फॉर्म आणि आत्मविश्वास अनेकदा एकमेकांसाठी पुरक असतो. न्यूझीलंड मालिकेतील सकारात्मक बाबींवर भाष्य करताना, पठाणने सांगितले की, विशेषतः विश्वचषक जवळ आलेला असताना, सूर्यकुमारच्या मानसिकतेसाठी त्याने केलेल्या धावा महत्त्वाच्या होत्या.
“त्याला स्वतःबद्दल चांगलं वाटणं खूप महत्त्वाचं होतं. कर्णधार असल्याने, तो विश्वचषक खेळणारच होता, पण धावा करून विश्वचषकात जाणे, हे त्याच्यासाठी महत्त्वाचे होते. मला नेहमीच त्याच्यावर विश्वास होता, मी त्याच्यावर विश्वास ठेवला होता आणि मालिकेपूर्वीच मी भाकीत केले होते की तो धावा करेल. हीच या न्यूझीलंड मालिकेतून मिळालेली सर्वात महत्त्वाची सकारात्मक गोष्ट आहे,” असं पठाण म्हणाला.





























