28 जानेवारी डेटा गोपनीयता दिवस: आजच्या आधुनिक जगात तंत्रज्ञान वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अनेक आधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध होत आहेत. ज्यामुळे सामान्य माणसाचे जीवन अधिक सोईस्कर झाले आहे. पण याचसोबत तांत्रिक धोक्यांचे प्रमाणही वाढत आहेत. जगभरातून रोज सायबर गुन्ह्यांबाबत एक तरी बातमी ऐकायला किंवा वाचायला मिळतेच. प्रसार माध्यमे तसेच वर्तमानपत्रेही त्यांच्या माध्यमातून या साबयर गुन्ह्यांबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत असतात. पण अनेकजण याकडे दुर्लक्ष, परिणामी भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागते. आणि यामधून जे नुकसान होते कधीही न भरून काढता येणारे असते. संपूर्ण जगभरात 28 जानेवारी हा दिवस ‘जागतिक डेटा प्रायव्हेसी दिन’ म्हणून साजरा केला जातो. सामान्य नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून दूर ठेवणे आणि त्यांचे संरक्षण करणे ह हा दिन साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डेटा प्रायव्हेसी (Data Priavcy) म्हणजे तांत्रिक माहिती गोपनीय ठेवणे. बऱ्याचवेळा इंटरनेटचा वापर करताना आपण आपली गोपनीय माहिती नकळत शेअर करत असतो. आणि याच माहितीचा वापर करत सायबर गुन्हेगार सामान्य नागरिकांना लुटण्याचे काम करत असतात. यापासून वाचण्यासाठी आणि माहिती सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी योग्य दक्षता घेणे आवश्यक आहे.
माहितीची गोपनीयता जपण्यासाठी पुढील गोष्टींची काळजी घ्या:
1. पासवर्ड मॅनेजमेंट
कोणत्याही अॅप किंवा वेबसाईटचा पासवर्ड बनवताना नाव आणि जन्मतारखेऐवजी अक्षरे, अंक आणि $@#% यांसारख्या चिन्हांचा वापर करा. तसेच प्रत्येक सोशल मिडिया किंवा बँक अकाऊंटसाठी एकच पासवर्ड वापरू नका. तसेच सोप्या अंकांच्या सेट चा वापर करणे टाळा जसे की, @123…, #3333, @444555….. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या सर्व सोशल मिडिया अकाऊंटवर ‘टू-स्टेप-व्हेरिफिरेशन’ नक्कीच सुरू करा.
2. सोशल मिडिया आणि अॅप्स इन्स्टॉलेशन
कोणतेही अॅप इन्स्टॉल करताना ते तुमचे कॉन्टॅक्ट्स, फोटो गॅलरी किंवा लोकेशनची परवानगी मागत असेल तर, खरंच त्या अॅपला त्याची गरज आहे का? हा विचार करा आणि सहजपणे परवानगी देणे टाळा. तुमच्या इन्स्टाग्राम किंवा फेसबुक अकाऊंटवर बायोमध्ये वैयक्तीक माहिती लिहिणे टाळा. जसे की, मोबाइल नं, पत्ता इत्यादी. व्यावसायिक अकाऊंट असेल तर, फक्त ई-मेल वापरणे काहीप्रमाणात सुरक्षित ठरेल. तसेच व्हॉट्सअॅप किंवा ई-मेलवर कोणत्याही संशायास्पद लिंकवर लगेचच क्लिक करणे टाळा. कारण एक क्लिक तुमचे संपूर्ण आयुष्य उद्धवस्त करू शकते.
3. बँक आणि आर्थिक व्यवहार
बँक व्यवहारांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की, बँक कधीही मोबाइलवर पिन (PIN) किंवा ओटीपी (OTP) मागत नाही. त्यामुळे जर तुम्हाला मेसेंजर किंवा व्हॉट्सअॅपवर कोणत्याही अज्ञात क्रमांकावरून ओटीपी आला, मागीतला गेला तर तो चुकूनही शेअर करू नका. मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागू शकते. तसेच तुमचे फोन सॉफ्टवेअर आणि बँकिंग अॅप्स नेहमी अपडेट ठेवा, यामुळे सुरक्षेचे नवीन फिचर्स डेव्हलप होतात.
4. इंटरनेट वापरताना खबरदारी घ्या
सार्वजनिक वाय-फाय वापरणे टाळा. रेल्वे स्टेशन किंवा कॅफेमध्ये मोफत वाय-फाय बँकेचे व्यवहार करणे किंवा लॉगिन करणे टाळा. दुसऱ्याचा संगणक वापरताना गुगलवर लॉगिन केले असल्यास पुन्हा लॉ-आऊट करायला विसरू नका. तसेच सायबर गुन्हेगार बनावट वेबसाईटचा वापर करून डिजिटल स्कॅम करण्याचा वापर करतात. म्हणूनच कोणत्याही वेबसाईटवर माहिती भरण्यापूर्वी यूआरएलमध्ये (URL) https:// आहे का ते तपासा. हे असले तर ती वेबसाईट सुरक्षित आहे.
वरिष्ठांना याबाबत माहिती कल्पना द्या
सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे तसेच तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करायचे असेल तर, वरील सर्व मुद्दे लक्षात ठेवा. ही माहिती तुमच्या कुटुंबात तसेच मित्र-मैत्रीणींपर्यंत पोहोचवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सायबर गुन्हेगार वरिष्ठांना किंवा लहान मुलांना
अधिक प्रमाणात लक्ष्य करतात . त्यामुळे त्यांना अशा फ्रॉडबाबत कल्पना द्या. घरातील लहान मुलांना सोशल मिडियावर अनोळखी व्यक्तींशी बोलू नये असे सांगा.





























