शैक्षणिक बातम्या: मध्य प्रदेशमधील सरकारी शाळांमध्ये अश्लील डान्सचा कार्यक्रम आयोजित केल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेच्या आवारामध्ये महिला डान्सर्सला बोलावून अश्लील नृत्यावर दौलत जादा करण्यात आली. महिला अश्लील डान्स करत असताना त्यांच्यावर पुरुष पैसे उधळत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाला जाग आली. या प्रकरणामध्ये मुख्याध्यापकांनीही आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली असून त्यांची प्रतिक्रिया चक्रावून टाकणारी आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नेमकं आहे तरी काय?
मध्य प्रदेशमधील दातिया येथील सरकारी माध्यमिक शाळेच्या आवारामध्ये आयोजित कार्यक्रमात महिलांनी केलेल्या अश्लील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हिडीओ दतिया जिल्ह्यातील परासरी गावातील सरकारी शाळेतील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये शाळेच्या मैदानामध्ये स्टेज टाकून मोठमोठ्याने गाणी लावून त्यावर महिलांकडून अश्लील डान्स करुन घेतला जात असल्याचं दिसत आहे. अनेकजण या महिलांवर पैसे उडवत असल्याचंही दिसत आहे.
मोठ्या संख्येनं गावकऱ्यांची हजेरी
कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं स्थानिक गावकरी उपस्थित होते. ज्या शाळेमध्ये मुलांना नैतिक शिक्षणाचे धडे दिले पाहिजे तिथेच अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आळ्याने लोकांना संताप व्यक्त केला आहे. प्रशासन व्यवस्थेचे धिंडवडे काढणारा हा प्रकार असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभाग आणि प्रशासनाला जाग आली असून त्यांनी कारवाईसंदर्भातील हलचाली सुरु केल्या आहेत.
शाळेच्या मुख्याध्यापकांचं म्हणणं काय?
शाळेचे मुख्याध्यापक जगनारायण भगत यांनी, “या कार्यक्रमासंदर्भात शाळेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती” असं स्पष्ट केलं आहे. “शाळेला नवीन वर्षानिमित्त दिलेल्या सुट्ट्यांच्या कालावधीदरम्यान या कार्यक्रमाचे शाळा प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता आयोजन करण्यात आलं,” असा दावा भगत यांनी केला आहे. मात्र मुख्याध्यापकांच्या या स्पष्टीकरणाने स्थानिक प्रशासनही चक्रावून गेलं आहे. हे असं कसं शक्य आहे असा सवाल मुख्याध्यापकांच्या स्पष्टीकरणावरुन उपस्थित केला जात आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांकडून या प्रकरणावर लेखी उत्तर मागितलं आहे. व्हायरल व्हिडीओची आम्ही दखल घेतली असून मुख्याध्यापकांकडून लेखी स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षण अधिकारी सुनील शुक्ला यांनी दिली.
कोणी दोषी आढळलं तर…
जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी नियमांनुसार, शाळेच्या आवारात केवळ सामाजिक, धार्मिक किंवा संस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ शकतं. या प्रकरणामध्ये शाळेशीसंबंधित जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं स्थानिक जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.





















