शिवसेनेने शाहरुख खानवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाने आगामी इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिझुर रहमानचा आपल्या संघात समावेश केल्याच्या वृत्तावर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याचं म्हटलं आहे, तसंच भारतीय भूमीवर व आयपीएलमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना खेळण्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली.
“जर शाहरुख खानने त्याला खेळवले आणि पैसे कमावले, तर त्या पैशांचा वापर तिथे दहशतवाद्यांना पोसण्यासाठी आणि आपल्या देशाविरुद्ध कट रचण्यासाठी केला जाईल. आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही,” असा इशारा आनंद दुहे यांनी दुबे यांनी दिला आहे.
शाहरुख खान, अभिनेत्री जुही चावला आणि तिचे पती जय मेहता कोलकाता संघाचे मालक आहेत. आनंद दुबे म्हणाले की, एक हिंदू, एक सनातनी आणि एक शिवसैनिक म्हणून ते आणि इतरजण या निर्णयाला विरोध करतील. त्यांनी पुनरुच्चार केला की, जर त्या खेळाडूला संघातून काढून टाकलं तर शाहरुख खानचा ‘आदर आणि सन्मान’ केला जाईल, परंतु पक्षाच्या मते देशाच्या हिताला बाधा पोहोचवणारी कोणतीही कृती पक्ष सहन करणार नाही.
त्यांचा पक्ष बांगलादेश आणि पाकिस्तानला शत्रू मानतो असं सांगताना त्यांनी संपूर्ण बहिष्काराची मागणी केली. “बांगलादेश आणि पाकिस्तान हे दोन्ही आपले शत्रू आहेत. त्यांचा पूर्णपणे बहिष्कार घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असे ते म्हणाले.
दुबे पुढे म्हणाले की, शिवसेना भारतात देशद्रोही लोकांच्या प्रवेशाला विरोध करेल आणि या मुद्द्यावर केंद्राचा पाठिंबा मागेल. “आम्ही सरकारला आम्हाला पाठिंबा देण्याची विनंती करू,” असxही त्यांनी सांगितलं आहे.
संगीत सोम यांच्यासह भाजप नेत्यांनीही हा आक्षेप नोंदवला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, शाहरुख खानने आयपीएल लिलावात बांगलादेशी वेगवान गोलंदाज रहमानला विकत घेतलं होते. नंतर, मेरठमधील एका जाहीर सभेत बोलताना, सोम यांनी बांगलादेशी खेळाडूला विकत घेऊन शाहरुख खानने देशाच्या हिताच्या विरोधात काम केल्याचा आरोप केला. त्यांनी शाहरुख खानला देशद्रोही म्हटलं आणि त्याला भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीका केली.
संगीत सोम यांनी आरोप केला की, रहमानला सुमारे 9 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले आहे आणि बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात हिंसाचाराच्या बातम्या येत असताना, त्या देशातील खेळाडूंना आयपीएलसारख्या मोठ्या व्यासपीठावर निवडले जात आहे. त्यांनी हा निर्णय राष्ट्रीय हिताच्या विरोधात असल्याचं म्हटले आणि इशारा दिला की, जर रहमान आगामी आयपीएल हंगामासाठी भारतात आला, तर परिस्थिती अनुकूल राहणार नाही आणि तो कदाचित विमानतळाबाहेरही पाऊल ठेवू शकणार नाही.





















