महाराष्ट्र हवामान बातम्या: 2025 या वर्षातील अखेरचे दोन दिवस शिल्लक असतानाच आता थंडीनं पकड आणखी मजबूत केल्याचं स्पष्ट होत आहे. दिल्ली एनसीआरपासून ते अगदी काश्मीरपर्यंत तापमानात चांगलीच घट झाल्याचं चित्र आहे, तर धुक्याच्या चादरीचा परिणाम वाहतुकीच्या विविध माध्यमांवर होताना दिसत आहे. धुक्याची ही चादर महाराष्ट्रासाठीही अपवाद नसून, राज्यात घाटमाथ्यावरील भागांमध्ये धुक्याची चादर वाहतुकीच अडचणी आणू शकते असा इशारा जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार पुन्हा एकदा राज्यात थंडीचा कडाका वाढणार असून, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कुठं गुलाबी थंडी तर, कुठं बोचरी थंडी पाहायला मिळणार आहे. पुढील 48 तासांमध्ये राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात किमान 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. ज्यामुळं उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात थंडी जोर धरत आहे. सध्या राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद परभणी इथं करण्यात आली असून, या ठिकाणी पारा 7.3 अंशांवर पोहोचला होता. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही अशीच स्थिती पाहायला मिळणार असून, दुपारच्या वेळी सूर्याचा दाह वगळता उर्वरित, वेळासाठी गार वारे थंडीची अनुभूती देऊन जाणार आहेत. थोडक्यात या वर्षाला कधीही न अनुभवलेल्या वातावरणाच्या स्थितीत देश निरोप देईल. जिथं एकिकडे थंडीटचा कडाका वाढलेला असेल, दुसरीकडे धुकं, सोसाट्याचा वारा आणि देशात एकिकडे पावसाचाही अंदाज आहे.
कुठं देण्यात आलाय पावसाचा इशारा?
राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये यंदाच्या वर्षाची सुरुवात हलक्या पावसानं होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार 31 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान नव्यानं पश्चिमी झंझावात सक्रिय होत असल्या कारणानं उत्तर आणि पश्चिमी राजस्थानात पावसाचा इशारा आहे.
तिथं दक्षिणेकडे कोमोरिन क्षेत्रापासून दक्षिण पूर्व अरबी समुद्रावरून वातावरणीय बदलांमुळं पुढचे तीन दिवस तामिळनाडूच्यिा बहुतांश भागांमध्ये पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.
काश्मीर, लाहौल खोऱ्यात हिमवृष्टी…
जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा कडाका वाञला असून, काश्मीरमध्ये गुलमर्ग वगळता उर्वरित संपूर्ण खोऱ्यावर बर्फाची चादर पाहायला मिळत आहे. तर, हिमाचलमध्ये लाहौलच्या खोऱ्यातही पारा शून्याच्या खाली गेला असल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तराखंडचा पर्वतीय भागसुद्धा या हिमवर्षावास अपवाद ठरला नसून नव्या वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण देश गारठणार असल्याचच इथं स्पष्ट होत आहे.





















