पहिली भारतीय नोट: स्वतंत्र भारताची सर्वात पहिली कागदी चलनी नोट ही एक रुपयाची होती. ही नोट 30 नोव्हेंबर 1949 रोजी भारत सरकारने जारी केली. त्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय फक्त मोठ्या चलनाच्या नोटा छापत असे. पण एक रुपयाची नोट थेट सरकारकडून प्रसिद्ध झाली. या नोटेवर तत्कालीन अर्थ सचिव के. आर. मेनन यांची सही होती. जी आरबीआय गव्हर्नरची नव्हती. डिझाईन अतिशय साधे आणि ब्रिटिश काळातील नोटांसारखे होते. ज्यात राष्ट्रीय चिन्हे होती पण फार कमी रंग आणि आकर्षकता होती.
जुन्या चलन पद्धतीचे वैशिष्ट्य काय?
1949 च्या नोटेत दशांश पद्धती नव्हती. एक रुपया म्हणजे 16 आणे किंवा 64 पैसे असे लिहिलेले होते. ही ‘अण्णा सिरीज’ म्हणून ओळखली जाणारी जुनी प्रथा होती. जी ब्रिटिश राजवटीतून आली होती. आजच्या नोटांमध्ये मात्र 1957 पासून दशांश पद्धत लागू झाली. ज्यात एक रुपया = 100 पैसे असे स्पष्ट आणि सोपे विभाजन आहे. हा बदल चलन वापरात अधिक सुसंगत आणि आधुनिकता आणणारा ठरला.
डिझाईन आणि राष्ट्रीय प्रतीकांचा वापर
पहिल्या नोटेचे स्वरूप फार साधे होते. फक्त मूलभूत राष्ट्रीय चिन्हे आणि कमी रंगसंगती. त्यात महात्मा गांधींचा फोटो नव्हता किंवा भारताच्या सांस्कृतिक वारश्याची मोठी छायाचित्रे नव्हती. उलट आजच्या महात्मा गांधी सिरीज नोटांमध्ये म्हणजेच 1996 पासून आणि 2016 च्या नव्या सिरीजमध्ये गांधीजींचा मोठा फोटो समोर असतो. मागच्या बाजूस अशोक स्तंभ, लाल किल्ला, सांची स्तूप, कोणार्क सूर्य मंदिर किंवा मंगळयान सारखी भारताच्या प्रगतीची आणि संस्कृतीची प्रतीके दिसतात. या बदलामुळे नोटा अधिक ओळख पटण्याजोग्या आणि अभिमानास्पद बनवता.
आधुनिक प्रगती
1949 च्या नोटेत खोट्या नोटा ओळखण्यासाठी कोणतेही प्रगत उपाय नव्हते. जसे रंग बदलणारा धागा, वॉटरमार्क किंवा छुपे चित्र नव्हते. ती फक्त साध्या छपाईची होती. ज्यामुळे बनावट नोटा सहज बनवता येत होत्या. आजच्या नोटांमध्ये मात्र अनेक उच्च सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. उदा. रंग बदलणारी शाई, विंडो असलेला सुरक्षा धागा, प्रकाशात दिसणारे वॉटरमार्क, लपलेले नंबर आणि दृष्टिहीनांसाठी खास रेषा, अशी वैशिष्ट्य आहेत. बनावटगिरी रोखण्यासाठी आणि चलन विश्वासार्ह बनवण्यासाठी हे विकसित केलं गेलंय.
प्रगती आणि सुरक्षिततेचे द्योतक
जुन्या नोटेत फक्त मर्यादित भाषांचा वापर होता, मुख्यतः इंग्रजी आणि हिंदी. आजच्या नोटांमध्ये मात्र किंमत 15 भारतीय भाषांमध्ये (मराठीसह) लिहिलेली असते, ज्यामुळे देशातील विविधता प्रतिबिंबित होते. नोटांवर ‘स्वच्छ भारत’ लोगो सारखी समकालीन मोहीमही दिसते. हा बदल फक्त चलन नव्हे तर राष्ट्रीय एकतेचे आणि आधुनिक भारताचे प्रतीक बनला आहे.या सर्व फरकांमुळे 1949 ची नोट इतिहासातील एक साधी सुरुवात वाटते, तर आजच्या नोटा भारताच्या प्रगतीचे आणि सुरक्षिततेचे द्योतक आहेत.





















