भारत विरुद्ध पाक : भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात अंडर 19 आशिया कप 2025 चा फायनल सामना दुबईत खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानने तब्बल 191 धावांनी भारताचा पराभव केला आहे. पाकिस्तानने विजयासाठी 347 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पूर्ण करण्यात टीम इंडिया अयशस्वी ठरली, कोणताही फलंदाज समाधानकारक कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे भारताला पराभूत करून पाकिस्तान हा U19 आशिया कप चॅम्पियन ठरला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात 14 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि पाकिस्तानी गोलंदाज अली रजा यांच्यात वाद झाला.
नेमकं काय घडलं?
पाकिस्तानने फायनलमध्ये 347 धावांचा मोठा स्कोअर उभा केला, टीम इंडियाला विजयासाठी 348 धावांचं आव्हान मिळालं होतं. हे आव्हान पूर्ण करण्यात वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेच्या ओपनिंग जोडीने भारताला वेगवान सुरुवात करून दिली. मात्र दोघे बाद झाल्यावर टीम इंडियाची मिडल ऑर्डर कोलमडली आणि संपूर्ण संघ 26.2 ओव्हरमध्ये 156 धावांवर ऑलआउट झाला. वैभव सूर्यवंशीने 10 बॉलमध्ये 26 धावांची कामगिरी केली. मात्र टीम इंडिया समोर धावांचा डोंगर उभा असताना वैभव सूर्यवंशीची विकेट पडल्यामुळे भारताचं मोठं नुकसान झालं. पाकिस्तानचा गोलंदाज अली रजाच्या गोलंदाजीवर ही विकेट पडली आणि यामुळे वैभव अजिबात खुश नव्हता. विकेट काढल्यावर गोलंदाजाने आक्रमक सेलिब्रेशन केलं. पॅव्हेलियनमध्ये परतताना वैभवने त्याच्या पायाकडे बोट दाखवत गोलंदाजाला हावभावाने उत्तर दिले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा : ‘या’ 5 कारणांमुळे U19 आशिया कप फायनलमध्ये भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला
पाहा व्हिडीओ :
वैभव सूर्यवंशी पाकिस्तानी लोकांना त्यांची स्थिती सांगत आहेत INDvsPAK pic.twitter.com/S24AaIdwno
राजू वाल्मिकी चौहान (RajuValmikiN) 21 डिसेंबर 2025
भारताने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय :
टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशविरुद्धच्या सेमी फायनल सामन्यात आठ विकेट्सनी शानदार विजय मिळवून अंतिम फेरीत पोहोचलेल्या पाकिस्तानने भारतीय गोलंदाजांना वर्चस्व गाजवू दिले नाही. समीर मिन्हास वगळता पाकिस्तानकडून उस्मान खानने 35, अहमद हुसेन 56, फरहान युसूफ 19, हमजा जहूरने 18 धावा केल्या. तर भारतीय गोलंदाज दीपेश देवेंद्रनने 3 विकेट्स, खिलम पटेल आणि हेनिल पटेलने प्रत्येकी 2 विकेट, कनिष्क चौहानने 1 विकेट घेतल्या. तर भारताकडून फलंदाजीत दीपेश देवेंद्रन (36) वगळता इतर कोणताही फलंदाज समाधानकारक कामगिरी करू शकला नाही. पाकिस्तानचा गोलंदाज अली राझाने 4 विकेट, मोहम्मद सय्यम, अब्दुल सुभान, हुजैफा अहसानने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.






























