शाळा हायब्रिड मोडवर चालतील: सध्या संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडली असून, अनेक ठिकाणी तर लोक अक्षरश: गारठले आहेत. पहाटेच्या थंडीमुळे शाळकरी मुलांनाही कुडकुडत शाळा गाठावी लागत आहेत. एकीकडे थंडीचा पारा वाढत असताना, दुसरीकडे प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ताही खालावत आहे. दरम्यान याच कारणामुळे शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय नेमका कोणी आणि कुठे घेतला आहे? जाणून घ्या
दिल्लीत शनिवारी ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) अंतर्गत चौथ्या टप्प्यातील उपाययोजना लागू करण्यात आल्यामुळे, इयत्ता नववी आणि अकरावीवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग संमिश्र (हायब्रीड) पद्धतीने घेतले जातील. दिल्ली शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राष्ट्रीय राजधानीतील ढासळत्या हवेच्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर, संबंधित इयत्तांचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात आले आहेत.
राजधानीतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ‘अत्यंत गंभीर’ श्रेणीत घसरल्यामुळे, वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (CAQM) दिल्लीत तातडीने GRAP 4 लागू केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
13 डिसेंबर रोजीच्या शिक्षण उपसंचालकांच्या परिपत्रकात म्हटलं आहे की, “शिक्षण विभाग, एनडीएमसी, एमसीडी आणि दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्व सरकारी, सरकारी अनुदानित, विनाअनुदानित मान्यताप्राप्त खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांना इयत्ता नववी आणि अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये ‘हायब्रीड मोड’मध्ये, म्हणजेच प्रत्यक्ष आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने (जिथे ऑनलाइन पद्धत शक्य आहे) पुढील आदेशापर्यंत तात्काळ प्रभावाने वर्ग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”
त्यात पुढे असेही म्हटले आहे की, जिथे ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध आहे, तिथे तो पर्याय निवडण्याचा अधिकार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडे असेल. या परिपत्रकात शाळांच्या मुख्याध्यापकांना ही माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत तात्काळ पोहोचवण्यास सांगितले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार, शनिवारी संध्याकाळी 7 वाजता राजधानीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 448 नोंदवला गेला. एक दिवसापूर्वी, 24 तासांची सरासरी AQI नोंद 349 होती, जी ‘अत्यंत खराब’ श्रेणीत येते.
GRAP 4 अंतर्गत, स्टेज 3 चे सर्व निर्बंध कायम राहतील आणि प्रदूषणाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अतिरिक्त निर्बंध लागू केले जातील. स्टेज 4 अंतर्गत, अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या किंवा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या ट्रक वगळता, इतर सर्व ट्रकच्या दिल्लीतील प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात येईल. एलएनजी, सीएनजी, इलेक्ट्रिक आणि BS-VI डिझेल ट्रकना प्रवेशाची परवानगी दिली जाईल.





















