23 दिवसांच्या बाळाचा मृत्यू: उत्तर प्रदेशमध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. येथील एका 23 दिवसांच्या तान्ह्या बाळाचा मृत्यू झाला असून त्यासाठी त्याचे पालकच जबाबदार ठरले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी गजरौला परिसरात राहणाऱ्या दांपत्याच्या चिमुकल्याचा त्यांच्या एका चुकीमुळे मृत्यू झाला. 23 दिवसांचं बाळ आई-वडिलांच्यामध्ये झोपलेले असताना दोघांमध्ये दाबले गेले आणि श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. हसनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिहाली प्रांतामध्ये रहिवाशांमध्ये ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली असून अनेकांनी घडलेल्या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. या घटनेमुळे हिवाळ्यामध्ये नवजात बालकांसोबत पालकांनी एकत्र झोपण्यासंदर्भातील धोक्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. डॉक्टरांनी पालकांना इशाराही दिला आहे.
नेमकं घडलं काय?
सुफियान असे या बाळाचं नाव होतं. बाळाचा जन्म 10 नोव्हेंबर रोजी सद्दाम अब्बासी (25) आणि त्याची पत्नी आस्मा यांच्या पोटी झाला. पहिल्या बाळाची जवळजवळ चार वर्षे वाट पाहिल्यानंतर त्यांना आपत्यप्राप्ती झालेली. शनिवारी रात्री बेडरुममध्ये बाळाच्या एका बाजूला आणि आणि दुसऱ्या बाजूला वडील असे तिघेही झोपी गेले. मात्र सोमवारी सकाळी बाळ बेडवर निपचित पडलेलं आढळून आलं. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पालकांनी नकळतपणे झोपेत कुस बदलली. दोघांनी कुस बदलल्याने बाळ या दोघांच्या मध्ये अडकलं. रविवारी सकाळी अस्मा बाळाला स्तनपान करण्यासाठी उठली असता तिला बाळ कोणताही प्रतिसाद देत नसल्याचं दिसून आलं. बाळ हालचाल करत नसल्याने ती घाबरली. अस्माने सद्दामच्या मदतीने तातडीने बाळाला गजरौली येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र तिथे बाळाला मृत घोषित करण्यात आलं.
कुटुंबाकडूनही बेजबाबदारपणावरुन नाराजी
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळ जन्मापासूनच कमकुवत म्हणजेच नाजूक प्रकृतीचे होते. बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता. बाळाला कावीळही झाली होती. डॉक्टरांनी श्वास गुदमरल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. बाळाचा असा विचित्र पद्धतीने मृत्यू झाल्याने या दांपत्याला मोठा मानसिक धक्का बसला आहे. कुटुंबातील सदस्यांनाही या दोघांना धीर देण्याआधी अशा बेजबाबदारपणे तुम्ही कसे वागलात असा जाब विचारला. मात्र नंतर कुटुंबियांनीच दोघांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
…म्हणून कोणतीही पोलीस तक्रार नाही
आरोग्य अधिकाऱ्यांनी खातरजमा केली की बाळाचा मृत्यू हा अपघाती होता. बाळाच्या शरीरावर दुखापतीच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. “चुकून बाळ पालकांच्या मध्ये सापडून गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला,” असं आरोग्य केंद्रातील डॉ. सिंग म्हणाले. या प्रकरणामध्ये कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही.
हिवाळ्यात एकत्र झोपण्याच्या धोक्यांबद्दल इशारा
डॉक्टरांनी यावर भर दिला की थंडीच्या महिन्यांत जेव्हा कुटुंबे जड ब्लँकेटखाली एकत्र झोपतात तेव्हा अशा घटना अधिक सामान्य होतात. “पालकांनी नवजात मुलांसोबत झोपताना अत्यंत सावधानता बाळगली पाहिजे, विशेषतः हिवाळ्यात,” असं डॉ. सिंग म्हणाले. बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित वर्मा यांनी असा सल्ला दिला की नवजात बालकांना वेगळे झोपवावे, आदर्शपणे पालकांच्या पलंगाजवळ असलेल्या बाळाच्या खाटेत किंवा पाळण्यात बाळाला झोपवावं.





















