Expressway Car Romance Video: उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेसवे एका घटनेमुळे चर्चेत आला आहे. या घटनेने फक्त सिस्टमवर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं नसून, महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांचं खासगी आयुष्यही सुरक्षित नसल्याचं सिद्ध केलं आहे. सुलतानपूर जिल्ह्यातील हलियापूर टोल प्लाझाजवळ तैनात असलेल्या एटीएमचा (अँटी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम) सहाय्यक व्यवस्थापक आशुतोष सरकार याच्यावर याप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या लोकांचे खासगी क्षण रेकॉर्ड केल्याबद्दल, त्यांना ब्लॅकमेल केल्याबद्दल आणि अखेर ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
8 डिसेंबरला हे प्रकरण सोशल मीडियावर समोर आलं तेव्हा ती केवळ तक्रार नव्हती, तर व्यवस्थेवर प्रश्चचिन्ह निर्माण करणारी घटना होती. तक्रारीसोबतच एक व्हिडीओ आणि सुलतानपूर जिल्हा दंडाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेलं एक सविस्तर पत्रदेखील व्हायरल झालं. यानंत अनेक पीडित पुढे आले आणि त्यानंतर पोलिसांनी आपली बाजू मांडली. प्रकरणाला वेग येताच, पोलिसांनी कारवाई सुरु केली आणि हलियापूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मोहम्मद रफन यांनी सहाय्यक व्यवस्थापक आशुतोष सरकारविरुद्ध गुन्हा दाखल केला.
कोण आहे आशुतोष सरकार?
या घटनेची सुरुवात पूर्वांचल एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या एका नवविवाहित जोडप्यापासून सुर होते. प्रवासादरम्यान, त्या जोडप्याने टोल प्लाझाच्या थोड्या अंतरावर गाडी थांबवली आणि कारच्या आत रोमान्स करायला सुरुवात केली. सुरक्षा आणि वाहतूक देखरेखीसाठी सामान्यतः रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातात, परंतु आशुतोष सरकार यांनी या कॅमेऱ्यांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. एटीएम सिस्टमशी जोडलेल्या कॅमेऱ्यांमुळे त्यांना त्यांच्या लाईव्ह फीडमध्ये थेट प्रवेश होता.
तक्रारीनुसार, आशुतोषने जोडप्याचे खासगी क्षण रेकॉर्ड केले. त्यानंतर तो घटनास्थळी पोहोचला आणि त्यांना व्हिडिओ दाखवला, त्याने त्यांच्याकडून 32 हजार रुपये उकळले. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली. तथापि, पैसे मिळाल्यानंतरही, आशुतोषने व्हिडिओ ऑनलाइन अपलोड केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर, संबंधित जोडप्याला धक्का बसला. भीती आणि लाज वाटत असतानाही त्यांनी बळ एकटवलं आणि मुख्यमंत्री, जिल्हा दंडाधिकारी, पोलिस अधीक्षकांना ही बाब कळवली. त्यानंतरच हा प्रकार समोर आला.
अनेक पीडित आले समोर
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, हे प्रकरण एकाच घटनेपुरते मर्यादित राहिले नाही. दोन दिवसांत, आणखी पाच ते सहा पीडितांनी पोलीस आणि प्रशासनाशी संपर्क साधला. या पीडितांनी एटीएम व्यवस्थापक आशुतोष सरकार एक्सप्रेसवेवर बसवलेल्या कॅमेऱ्यांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला. तो महिला, तरुणी आणि कुटुंबांवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेऱ्यांचा वापर करत होता. जेव्हा जेव्हा त्याला कोणतीही संशयास्पद हालचाल दिसली तेव्हा तो व्हिडिओ सेव्ह करत असे आणि काही वेळाने पीडितांकडे जात असे, त्यांना धमकावत असे आणि त्यांच्याकडून पैसे उकळत असे. पीडितांनी सांगितले की हे अनेक महिन्यांपासून सुरू होते, परंतु तक्रार दाखल करण्याचे धाडस कोणाकडेही नव्हतं. लाज आणि समाजाच्या भीतीने अनेकजण गप्प राहिले. तथापि, व्हायरल व्हिडिओ सार्वजनिक होताच, अनेक पीडितांनी पुढे येऊन पोलिसांना ठोस पुरावे दिले.
अंतर्गत यंत्रणेचा गैरवापर
हलियापूर टोल प्लाझावरील एटीएम विभागाचे पर्यवेक्षण करणाऱ्या आशुतोषवर कॅमेऱ्यांचं निरीक्षण करण्याची जबाबदारी होती. एटीएमचा उद्देश सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण आणि एक्सप्रेसवेवरील अपघातांची तात्काळ माहिती देणं आहे. तथापि, त्याने याच सुविधेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला.
एफआयआरमध्ये तो एक्सप्रेसवेवरील वाहनांचे निरीक्षण करत नव्हता तर आसपासच्या गावांमधील रस्त्यांवर आणि गल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेऱ्यांची दिशा बदलत असे असा उल्लेख आहे. त्याने अनेक वेळा ग्रामीण महिला आणि मुलींचे फुटेज देखील रेकॉर्ड केले. पोलिसांचे म्हणणं आहे की हा एक पूर्वनियोजित गुन्हा होता, ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर चुकीच्या हेतूंसाठी करण्यात आला. पोलीस कॅमेरा लॉग आणि फुटेज हिस्ट्री देखील तपासत आहे.
हे प्रकरण सार्वजनिक होताच एटीएमवर देखरेख करणारी कंत्राट कंपनी कारवाई केली. कंपनीने आशुतोषला तात्काळ कामावरून काढून टाकल्याचा दावा केला. तथापि, निलंबनाच्या पत्रावर 30 नोव्हेंबर 2025 ही तारीख होती. यामुळे संशय वाढला. पीडितांनी 2 डिसेंबर रोजी तक्रार दाखल केल्यामुळे, कंपनीने आधीच कारवाई केली आहे असं दाखवण्यासाठी कामावरून काढून टाकण्याची तारीख आधीची घेतली. असाही संशय आहे की कंपनीला आशुतोषच्या कृत्यांची माहिती होती परंतु प्रकरण सार्वजनिक होईपर्यंत त्यांनी कारवाई केली नाही.
मला फसवण्यात आलं असल्याचा आरोपीचा दावा
या प्रकरणातील आरोपी माजी टोल व्यवस्थापक आशुतोष सरकारने त्याच्यावरील आरोप फेटाळले आहेत. हा त्याच्या काही सहकाऱ्यांनी रचलेला कट आहे, ज्यांना त्यांच्या नोकरीचा हेवा वाटत होता, असा त्याचा दावा आहे. आशुतोषचा दावा आहे की, त्याच्याकडे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. अनेक लोक कॅमेरा फीड पाहतात, पण मला लक्ष्य करून फसवलं जात आहे असाही त्याचा दावा आहे.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे. या नेटवर्कमध्ये सीसीटीव्ही सिस्टमशी जोडलेले आणखी कोणी सामील होते का याचाही पोलिस तपास करत आहेत.
हलियापूर पोलिसांचे म्हणणे आहे की हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळले जात आहे. हे केवळ गोपनीयतेच्या अधिकाराचे गंभीर उल्लंघन नाही तर तंत्रज्ञानाचा गैरवापर देखील आहे. व्हायरल व्हिडिओ कुठे पाठवले गेले, ते कोणी अपलोड केले आणि ते कोणी शेअर केले याचाही तपास सुरू आहे.





















