गोवा नाईट क्लब आग: उत्तर गोव्यातील अर्पोरा गावात असलेल्या ‘बर्च बाय रोमियो लेन्स’ नाइट क्लबला लागलेल्या आगीतील मृतांची संख्या 25 वर पोहचली आहे. हा सारा घटनाक्रम मध्यरात्रीच्या सुमारस घडल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना मृतांपैकी बहुतांशी लोकांचा मृत्यू हा श्वास गुदमरल्याने झाल्याचं त्यांनी सांगितलं. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असतानाच आता या प्रकरणावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या जाऊ लागल्या आहेत. गोव्यातील एका नेत्याने तर या दुर्घटनेला ‘वेल प्लॅन मर्डर’ असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांनी घडलेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आणि सखोल चौकशीचे आदेश दिले. “क्लबमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे पालन झाले नव्हते, त्यामुळे व्यवस्थापन आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असं मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
नक्की पाहा >> गोव्यातील ‘त्या’ क्लबमधला Inside Video! 25 जणांच्या मृत्यूपूर्वीचा हादरवणारा घटनाक्रम पाहाच
गोवा डीजीपी आलोक कुमार यांनी सांगितले की, पोलिसांना रात्री 12:04 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. तातडीने अग्निशमन दल, पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं. सर्व 23 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, ते शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले गेले.
गोव्यातील अर्पोरा येथील बर्च नाईट क्लबला मध्यरात्री भीषण आग लागून 23 जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक बळी 4 पर्यटकांसह कर्मचारी आहेत. सिलेंडरचा स्फोट झाल्याचा संशय आहे. #गोवा #GoaFireAccident pic.twitter.com/4WbbyZtC88
— तेलंगणा एक्सप्रेस (@XpressTG) ७ डिसेंबर २०२५
हा मर्डर असल्याचा आरोप
काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी नाइट क्लबला लागलेल्या आगीची दुर्घटना ही ठरवून केलेला मर्डर असल्याचा हल्लाबोल केला आहे. ‘गोव्यातील आजची दुर्घटना म्हणजे वेल प्लॅन मर्डर आहे,’ असं अमित पाटकर म्हणालेत. सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप करताना, “आजचा दिवस हा गोव्याच्या इतिहासातील काळा दिवस आहे,” असंही ते म्हणालेत. “गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात घालू नये. त्यांना इकडे बोलावून त्यांचा खून करू नये,” असं विधानही अमित पाटकर यांनी केलं आहे. दुसरीकडे स्थानिकांनी थेट सरकारवर आरोप करताना या अपघातासाठी स्थानिक यंत्रणाच कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.
मोदींनी व्यक्त केल्या संवेदना
पंतप्रधान मोदींनी सकाळीच आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. “गोव्यातील अर्पोरा येथील आगीची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो,” असं मोदींनी म्हटलं आहे. तसेच, “गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी परिस्थितीबद्दल बोललो. राज्य सरकार बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे,” असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
आरपोरा, गोव्यात लागलेली आगीची घटना अत्यंत दुःखद आहे. माझे विचार त्या सर्वांसोबत आहेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी परिस्थितीबद्दल बोललो. राज्य सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करत आहे…
— नरेंद्र मोदी (@narendramodi) ७ डिसेंबर २०२५
मदत जाहीर
पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान सहाय्यता निधीमधून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची नुकसानभरपाई देणार असल्याचं सांगितलं आहे. तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जीईल असं पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.





















